एल अँड टी फायनान्स कंपनीने सिक्‍युअर्ड, रिडीमेबल, नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्स (एनसीडी) बाजारात आणण्याचे ठरविले आहे. या “एनसीडीं’ची विक्री 16 डिसेंबर रोजी खुली होत असून, ती नियोजित वेळापत्रकानुसार 30 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या इश्‍यूद्वारे कमाल 8.65 टक्‍क्‍यांपर्यंत व्याज दिले जाणार आहे.
 
यात किमान गुंतवणूक दहा हजार रुपये असून, त्यानंतर एक हजाराच्या पटीत गुंतवणूक करता येणार आहे. हे डिबेंचर 36, 60 आणि 84 महिन्यांच्या मुदतीचे असून, त्यात मासिक आणि वार्षिक व्याज; तसेच संचयी (क्‍युम्युलेटिव्ह) पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. या डिबेंचरवर मुदतीनुसार आणि व्याजाच्या पर्यायानुसार वेगवेगळे व्याजदर असून, ते 8.25 टक्के ते 8.65 टक्के या पातळीदरम्यान आहेत, असे कंपनीने म्हटले आहे.
 
हे डिबेंचर फक्त डिमॅट स्वरुपातच मिळणार असून, त्यासाठी “ऍस्बा’ पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या पद्धतीमुळे अर्जासोबत धनादेश जोडावा लागणार नाही. प्रत्यक्ष डिबेंचर वाटपाच्यावेळी गुंतवणूकदारांच्या खात्यातून संबंधित रक्कम वळती करून घेतली जाते. प्रथम अर्ज करणाऱ्यांना प्राधान्य या तत्वावर डिबेंचरचे वाटप होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. या इश्‍यूसाठी प्रमुख पतमानांकन कंपन्यांनी “एएए/स्टेबल’ असे रेटिंग दिलेले आहे. एनसीडीची मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) नोंदणी होणार आहे.

अभिप्राय द्या!