एचडीएफसी समूहाच्या एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस या बिगर बॅंकिंग वित्तीय कंपनीचे बाजारमूल्य 90,000 कोटी रुपयांवर पोचले आहे. एचडीबीची अजून शेअर बाजारात नोंदणी झालेली नाही. मात्र बिगर नोंदणीकृत बाजारात गुंतवणूकदारांनी एचडीबीमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. एचडीएफसी समूहाचे आदित्य पुरी हेच एचडीबीचे नेतृत्व करत आहेत.
अनलिस्टेट सेंकडरी मार्केटमध्ये म्हणजेच बिगर नोंदणीकृत बाजारात एचडीबीच्या शेअरची किंमत 1,100 रुपये प्रति शेअरवर पोचली आहे. मागील वर्षी एचडीबीच्या शेअरची किंमत 600-700 रुपये प्रति शेअर या पातळीवर होती. त्यामुळे एचडीबी देशातील चौथ्या क्रमांकाची बाजारमूल्य असलेली बिगर बॅंकिंग वित्तीय कंपनी बनली आङे. देशातील एनबीएफसी क्षेत्र रोकडचा अभाव आणि इतर संकटांना तोंड देत असताना एचडीएफसी समूहाच्या एचडीबीची कामगिरी मात्र दमदार झाली आहे. यातून एचडीएफसी समूहाची या क्षेत्रातील पकड दिसून येते.
सध्या एचडीएफसी बॅंकेचा कारभार सांभाळत असलेले आदित्य पुरी पुढील वर्षी बॅंकेच्या दैनंदिन कामकाजातून बाहेर पडल्यानंतर एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये सक्रिय होतील या अपेक्षेने गुंतवणूकदारांनी एचडीबीमध्ये जोरदार गुंतवणूक केली आहे. पुरी 26 ऑक्टोबर 2020ला निवृत्त होत आहेत. पुढील 12 ते 18 महिन्यात एचडीबीचा आयपीओ बाजारात येण्याची शक्यता पुरींनी व्यक्त केली आहे. एचडीबीमध्ये एचडीएफसी बॅंकेचा 95.9 टक्के हिस्सा आहे.

अभिप्राय द्या!