निप्पॉन इंडिया (पूर्वीच्या रिलायन्स) म्युच्युअल फंडाने पुन्हा एकदा सॅलरी अॅडव्हान्टेज योजना आणली आहे. दर महिन्याला जमा होणाऱ्या पगारावर बँकेच्या तुलनेत जास्तीचे व्याज मिळवून फायदा घेण्याचा पर्याय नोकरदारांना या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे.
साधारणतः बहुतेक नोकरदारांची दर महिन्याला खर्च होणारी रक्कम वगळता काही रक्कम बँकेच्या खात्यात शिल्लक राहते. या रकमेवर बँकेकडून वार्षिक 3.5 ते 4 टक्क्यांपर्यंतचे व्याज मिळते. मात्र लिक्विड फंडांच्या माध्यमातून वार्षिक 6 ते 7 टक्क्यांपर्यंतचे व्याज मिळविण्याची संधी या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे.
योजनेचा लाभ घेणाऱ्या नोकरदारांना दर महिन्याला बँक खात्यात जमा होणारी पगार निप्पॉन इंडियाच्या खात्यात जमा करता येणार आहे. ज्या खातेदाराला पूर्ण रक्कम म्युच्युअल फंड खात्यात जमा करायची नाही अशा गुंतवणूकदार/ खातेधारकांसाठी ठराविक रक्कम निप्पॉन इंडियाच्या खात्यात आणि ठराविक रक्कम बँक खात्यात या स्वरूपात देखील ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे म्युच्युअल फंड खात्यात देखील बँक खात्याप्रमाणेच लिक्विडीटी / तरलता रहावी या उद्देशाने खातेधारकाला व्हिसा डेबिट कार्ड दिले जाईल. जेणेकरून खातेधारकाला एटीएम किंवा स्वॅप मशीनच्या माध्यमातून देखील व्यवहार करता येतील.
या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कंपनीने आतापर्यंत देशातील 100 मोठ्या कंपन्यांशी करार केले आहेत.