युटीआय अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लवकरच आयपीओ बाजारात आणणार आहे. युटीआय एएमसीने सेबीकडे यासंदर्भातील कागदपत्रे सादर केली आहेत. कंपनी आयपीओच्या माध्यमातून 3,000 कोटी रुपयांचे भांडवल उभारणार आहे. व्यवस्थापनाखालील गुंतवणूक लक्षात घेता युटीआय एएमसी ही देशातील सर्वात मोठ्या एएमसीपैकी एक आहे. युटीआय एएमसीच्या आयपीओद्वारे 3,89,87,081 शेअर बाजारात आणण्यात येणार आहेत.
यात स्टेट बॅंक ऑफ इंडिया युटीआय एएमसीमधील आपल्या 1,04,59,949 शेअरची विक्री करणार असून लाईफ इन्श्युरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया 1,04,59,949 शेअरची, बॅंक ऑफ बडोदा 1,04,59,949 शेअरची, पंजाब नॅशनल बॅंक 3,80,3,617 शेअरची आणि टी रोव प्राईस इंटरनॅशनल 3,80,3,617 शेअरची विक्री करणार आहे. या सर्व वित्तसंस्थांचा युटीआय एएमसीमध्ये हिस्सा आहे.
या आयपीओच्या माध्यमातून युटीआय एएमसी जवळपास 3,000 कोटी रुपयांचे भांडवल उभारणार असल्याची अपेक्षा तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. अमेरिकास्थित टी रोव प्राईस इंटरनॅशनलचा युटीआय एएमसीमध्ये 26 टक्के हिस्सा आहे.
युटीआय एएमसीच्या आयपीओचे व्यवस्थापन कोटक महिंद्रा कॅपिटल, अॅक्सिस कॅपिटल, सिटीबॅंक, डीएसपी मेरील लिंच, आयसीआयसीआय सिक्युरिटीज, जे एम फायनान्शियल आणि एसबीआय कॅपिटल या वित्तसंस्था करणार आहेत. युटीआय एएमसीच्या शेअरची नोंदणी बीएसई आणि एनएसई दोन्हीकडे प्रस्तावित आहे.