येत्या ४ दिवसात नवीन वर्षाची सुरवात होईल ! गेल्या वर्षी गुंतवणुकीत झालेल्या चुका यावर्षी आपण करणर नाही असा निश्चय आपण सर्वानीच करूया !!

सन २०२० मध्ये गुंतवणूक करताना खालील गोष्टी आपण पहाव्यात हा धनलाभ तर्फे आपल्याला सल्ला !!

१ कोणत्याही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याआधी त्याच्या पोर्टफोलिओमध्ये कोणत्या कंपन्या किंवा कोणते रोखे आहेत ते बघा. फक्त मागील परतावे बघून गुंतवणूक करू नका.

२ मार्केट कॅप संलग्न गुंतवणूक करताना किंमत/उत्पन्न (पी/ई) गुणोत्तराकडे लक्ष असू द्या. आजघडीला स्मॉल आणि मिड कॅप निर्देशांक गुंतवणुकीसाठी जास्त आकर्षक आहेत. परंतु तिथे जोखीमसुद्धा जास्त आहे.

३ बाजाराच्या पी/ई बरोबर महागाई आणि त्यानुसार वाढणाऱ्या व्याजदरांकडेसुद्धा लक्ष असू द्या. जर हे दोन्ही लवकर वाढले तर बाजारातील परतावे कमी होतील आणि त्याचा जास्त फटका स्मॉल आणि मिडकॅप गुंतवणुकीला बसेल.

४ रोखेसंलग्न म्युच्युअल फंड किती सुरक्षित आहेत आणि महागाईबरोबर जुळवून घेणारे आहेत हे बघून घ्या. अल्ट्रा शॉर्ट टर्म, शॉर्ट टर्म, मीडियम टर्म, कॉर्पोरेट बॉण्ड, बँकिंग आणि पीएसयू डेट फंड, गिल्ट फंड या सर्वाची जोखीम आणि फायदे समजून घ्यावी आणि त्यानुसार गुंतवणूक करा.

५ ‘एसआयपी’च्या आधाराने गुंतवणूक सुरू ठेवा. नव्या गुतंवणूकदाराने सुरुवात करताना कमी जोखीम असलेले फंड निवडावे. अग्रेसिव्ह हायब्रीड फंडसुद्धा मार्केटची जोखीम बाळगून आहेत तेव्हा ते येत्या काळात कदाचित कमी परतावे देऊ शकतील याची जाण असू द्या.

६ आपल्या देशाबाहेरच्या घटनांचा वेध घ्या. अमेरिकेचे येत्या वर्षांतील धोरण, चीनमधील परिस्थिती, या दोन्हीही गोष्टींचा आपल्या बाजारावर परिणाम होतो हे ध्यानात घ्या.

७ हवामान बदल, डिजिटायझेशन, आशियाई देशांमध्ये वाढणारं कंझम्पशन, वाढणारे आयुर्मान, मानसिक अस्थर्य – या सर्व गोष्टींचा आपल्या आयुष्यावर आणि गुंतवणुकीवर होणारा परिणाम समजून घ्या.

८ थेट गुंतवणुकीसाठी कंपनी निवडताना तिचा व्यवसाय येत्या काळात राहील की नाही याबद्दल चौकस राहा.

९. तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या राहणीमानामध्ये आणि मानसिकतेत खूप फरक आहे. तेव्हा आर्थिक गुंतवणुकीबरोबर भावनिक गुंतवणूकसुद्धा प्रगल्भ करा.

आणि तज्ञ सल्लागाराचाच सल्ला घ्यावा हे ध्यानी असुद्या !!

अभिप्राय द्या!