या कॅलेंडर वर्षातील अकरा महिन्यात गुंतवणुकदारांनी आर्बिट्राज फंडांमध्ये 27,958 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. सुरक्षित गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठीचा पर्याय म्हणून आर्बिट्राज फंडाकडे बघितले जाते. उच्च उत्पन्न गटातील गुंतवणुकदार डेट फंडांसमोर आलेल्या संकटांमुळे डेट फंडांपासून दूर राहिले आणि त्यांनी आर्बिट्राज फंडांकडे मोर्चा वळवला. त्यातून या फंड प्रकारातील गुंतवणूक वाढली आहे.
त्यातच करबचतीचा पर्याय आणि लिक्विड फंडांमधून मिळणारा कमी परतावा यामुळे देखील गुंतवणूकदार आर्बिट्राज फंडात गुंतवणूक करताना दिसत आहेत. एका अहवालानुसार आर्बिट्राज फंडांनी मागील वर्षभरात जवळपास 5.82 टक्क्यांचा परतावा दिला आहे. आर्बिट्राज फंड हा बाजारातील अनिश्चिततेच्या काळात अधिक सुरक्षित फंड प्रकार आहे असे गुंतवणूकदारांना वाटत असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. आयएल अॅंड एफएस आणि डीएचएफएल या दोन कंपन्यांमधील आर्थिक अरिष्टामुळे सप्टेंबर 2018 पासून गुंतवणूकदारांना डेट प्रकारांविषयी चिंता वाटते आहे. त्यातच डेट प्रकारातील अनेक योजनांचे पतमानांकन घसरल्यामुळे गुंतवणूकदारांना तोटा झाला होता. त्यामुळे गुंतवणूकदार डेट फंडांपासून दूरच राहत आहेत.
याव्यतिरिक्त आर्बिट्राज फंडांतील गुंतवणूक वाढवण्यामागचे कारण म्हणजे लिक्विड फंडांवर लावण्यात आलेला एक्झिट लोड. लिक्विड फंडातून गुंतवणूक सात दिवसांच्या आत काढून घेतल्यास एक्झिट लोड लावण्यात आला आहे. त्यातच सद्य परिस्थितीत लिक्विड फंडातील परतावाही तुलनात्मकरित्या आकर्षक नाही. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून आर्बिट्राज फंडांमधील गुंतवणूकीत वाढ झाली आहे.