मागील वर्षी (2019) आयआरसीटीसी, सीएसबी बँक, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक, अॅफल इंडियासारख्या इतर कंपन्यांच्या आयपीओला मिळालेल्या मोठ्या प्रतिसादांनंतर आणि शेअर बाजारात सकारात्मक वातावरण तयार झाल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांनी 2020 मध्ये आपले आयपीओ आणण्याचे प्रस्तावित केले आहे. नवीन वर्षात आयपीओ आणण्याची शक्यता असलेल्या कंपन्यांचा थोडक्यात घेतलेला आढावा:
बर्गर किंग
फास्ट-फूड क्षेत्रात आघाडीची बर्गर किंग इंडिया यावर्षी शेअर बाजारात नोंदणी करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. बर्गर किंग इंडियामध्ये एव्हरस्टोन कॅपिटलचा सर्वात मोठा हिस्सा आहे. त्यातील काही हिस्सा कमी करून भांडवल उभारणी करण्याचा कंपनीचा प्रयत्न असणार आहे. यासाठी नव्याने 400 कोटींची तर दुय्यम हिस्सा विक्री करून 600 कोटींची उभारणी करण्याचा कंपनीचा मानस आहे.
युटीआय एएमसी 
देशातील सर्वात जुनी म्युच्युअल फंड कंपनी युटीआय एएमसी देखील आपला आयपीओ बाजारात आणणार आहे. कंपनीत सध्या स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, एलआयसी, पंजाब नॅशनल बँक आणि टी रोइ प्राइस या पाच भागधारकांचा हिस्सा आहे. यातील 1,42,63,566 शेअरची आयपीओच्या माध्यमातून विक्री करून 8.25 टक्क्यांची भागीदारी कमी करण्याची कंपनीची योजना आहे.
एसबीआय कार्ड्स अँड पेमेंट्स
स्टेट बँक ऑफ इंडियाची उपकंपनी असलेल्या एसबीआय कार्ड्स अँड पेमेंट्सने नोव्हेंबर 2019 मध्येच आयपीओ संदर्भात सेबीकडे अर्ज केला आहे. कंपनीने सादर केलेल्या रेड हिअरिंग प्रॉस्पेकट्सनुसार कंपनी साधारणतः 8500 ते 9000 कोटींची भांडवल उभारणी करणार आहे. यापैकी साधारणतः 500 कोटी रुपये पब्लिक इश्यूच्या माध्यमातून तर बाकीचे ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून उभारले जाणार आहेत.
होम फर्स्ट फायनान्स
मुंबई स्थित होम फर्स्ट फायनान्सने देखील नोव्हेंबर महिन्यात आयपीओसाठी सेबीकडे अर्ज दाखल केला आहे. त्यानुसार कंपनी 1500 कोटींचे भांडवल नव्याने उभारणार असून 400 कोटी पब्लिक इश्यूच्या माध्यमातून तर 1,100 कोटी रुपये प्रवर्तक आणि गुंतवणूकदारांच्या ऑफर फॉर सेल मधून उभारले जातील.
 ई ई एस एल 
राज्य-संचालित एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) देखील ऊर्जा उत्पादनात वाढ करण्यासाठी आयपीओ बाजारात आणणार आहे.
कंप्यूटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस (सीएएमएस) आरटीए  
कंप्यूटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस, भारतातील अनेक म्युच्युअल म्युच्युअल फंडांसाठी रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट (आरटीए) म्हणून काम पाहणारी कंपनी या वर्षी 1000 कोटी रुपये भांडवल उभारण्याची योजना आखत आहेत.
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक 
मायक्रोफायनान्स कंपनी इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेने 1000 कोटी रुपयांच्या भांडवल उभारणीसाठी रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस सेबीकडे सादर केले आहे.  प्रस्तावानुसार पब्लिक इश्यूच्या माध्यमातून 550 कोटी तर प्रवर्तक इक्विटास होल्डिंग्ज लिमिटेड (ईएचएल) कडून 8 कोटी शेअर ऑफर फॉर सेल विक्रीसाठी काढले जाणार आहेत.
ईज माय ट्रिप
ऑनलाईन ट्रॅव्हल कंपनी ईज माय ट्रिपने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भांडवली बाजार नियामक सेबीकडे 510 कोटींच्या आयपीओचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यानुसार 255 कोटींच्या शेअरची ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून विक्री करण्यात येईल. तर 255 कोटी रुपये पब्लिक इश्यूसाठी राखीव ठेवण्यात येतील.
एनएसई 
राष्ट्रीय पातळीवरील स्टॉक एक्सचेंज एनएसई देखील यावर्षी आपला आयपीओ बाजारात घेऊन येण्याची शक्यता आहे. मागील तीन वर्षांपासून एनएसई यासाठी प्रयत्नशील आहे. परंतु शेअर बाजार नियामक संस्था सेबीकडून एनएसईच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध चौकशी सुरु असल्याने त्यांना आयपीओ आणण्यापासून रोखण्यात आले होते. मात्र 31 ऑक्टोबर 2019 रोजी ही बंदी उठली असून चालू वर्षात एनएसई  आयपीओ  आणण्याची शक्यता आहे. वर्तमान भागीदारांचे 20 ते 25 टक्के हिस्सा कमी करून आयपीओ आणला जाईल.
आयआरईडीए
100 टक्के सरकारच्या मालकीची संस्था असलेली इंटिग्रेटेड रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीला (आयआरईडीए) आयपीओ आणण्यासाठी  ऑक्टोबरमध्ये सेबी कडून अंतिम मान्यता मिळाली आहे. कंपनीतील काही हिस्सा विक्रीस काढून सरकारने 700 ते 750 कोटी रुपयांचे भांडवल उभारणीचे लक्ष्य ठेवले आहे.

अभिप्राय द्या!