देशातील म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत 2019 मध्ये 3.15 लाख कोटी रुपयांची भर पडली आहे. 2019 च्या म्युच्युअल फंडातील एकूण गुंतवणुकीत 13 टक्क्यांची वाढ झाली आहे.  डेट प्रकारातील वाढलेल्या गुंतवणुकीमुळे आणि सेबीने गुंतवणुकदारांचा विश्वास वाढवण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांमुळे म्युच्युअल फंडातील एकूण गुंतवणूकीत चांगलीच वाढ झाली आहे. भारतातील म्युच्युअल फंड योजनांमधील एकूण गुंतवणूक डिसेंबर 2019 अखेर 26.77 लाख कोटी रुपयांवर पोचली आहे. 
 
डिसेंबर 2018 अखेर देशातील म्युच्युअल फंड योजनांमधील एकूण गुंतवणूक 23.62 लाख कोटी रुपये इतकी होती. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाने (अॅम्फी) यासंदर्भातील आकडेवारी जाहीर केली आहे. 2019 मध्ये देशातील म्युच्युअल फंड क्षेत्रातील 44 म्युच्युअल फंड कंपन्याद्वारे व्यवस्थापन केल्या जाणाऱ्या एकूण गुंतवणुकीचे मूल्य 2018च्या तुलनेत 7.5 टक्क्यांनी वाढले आहे. अर्थात 2017 मध्ये म्युच्युअल फंड गुंतवणुकीत घवघवीत 32 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली होती. 2017 मध्ये म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीत 5.4 लाख कोटी रुपयांची भर पडली होती.
 
इक्विटी आणि निश्चित उत्पन्न योजनांसंदर्भात गुंतवणूकदारांमध्ये असलेल्या नकारात्मक वातावरणाच्या पार्श्वभूमीवर म्युच्युअल फंडात झालेली दोन आकडी वाढ हे खूपच सकारात्मक चिन्ह असल्याचे मत म्युच्युअल फंड क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 2019 मध्ये सलग सातव्या वर्षी म्युच्युअल फंड योजनांमधील गुंतवणुकीत वाढ नोंदवण्यात आली आहे. 

अभिप्राय द्या!