शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील अस्थिरता ज्यांना नको असते, अशी मंडळी साधारणपणे बॅंक किंवा पोस्टाच्या मुदत ठेवींत गुंतवणूक करताना दिसतात. या ठिकाणी निश्‍चित दराने परतावा मिळत असल्याने अनेक जण मुदत ठेवींत मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवितात. पण सध्या ठेवींचे व्याजदर खूप कमी झाल्याने त्यांच्यातही चिंतेचे वातावरण आहे. अशा मनःस्थितीत असलेल्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांना खासगी कंपन्यांच्या “नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर’चा (एनसीडी) पर्याय आहे. अलीकडच्या काळात विविध कंपन्या असे “एनसीडी’ इश्‍यू बाजारात आणत आहेत. अशा इश्‍यूंच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उभारला जात आहे. गेल्याच महिन्यात आलेल्या एल अँड टी फायनान्सच्या “एनसीडी’ इश्‍यूला गुंतवणूकदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे हा इश्‍यू लगेच दुसऱ्या दिवशी बंद करावा लागला होता. मुदत ठेवींपेक्षा थोडा अधिक परतावा देणारा हा एक चांगला पर्याय असल्याने त्याला गुंतवणूकदारांची पसंती मिळत आहे. सुरक्षितता, तरलता व परतावा हे तीन निकष तपासून यात गुंतवणूक करणे श्रेयस्कर ठरते. “ट्रिपल ए’ रेटिंग असलेले इश्‍यू हे सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वांत चांगले समजले जातात. “एनसीडीं’ची नोंदणी बाजारात करण्यात येत असल्याने त्यांची मुदतीपूर्वी खरेदी-विक्री करता येते. अलीकडे सर्व “एनसीडी’ हे “डी-मॅट’ स्वरूपात असल्याने त्यावर “टीडीएस’ होत नाही. परंतु, मिळणारे व्याज करपात्र असते, हे लक्षात ठेवावे. “प्रथम अर्ज करणाऱ्यांना प्राधान्य’ या तत्त्वावर “एनसीडीं’चे वाटप होणार असल्याने अगदी सुरवातीला अर्ज करणाऱ्यांना “एनसीडी’ मिळण्याची शक्‍यता अधिक असते. 
बाजारातील नवे “एनसीडी’ इश्‍यू 
 
1) टाटा कॅपिटल हाउसिंग फायनान्स लि. 
 
रेटिंग ः “ट्रिपल ए’ 
इश्‍यू खुला ः 7 जानेवारी 2020 
इश्‍यू बंद ः 17 जानेवारी 2020 
(प्रतिसादानुसार आधीही बंद होऊ शकतो.) 
वाटप ः प्रथम येणाऱ्यास प्राधान्य 
किमान गुंतवणूक ः 10 हजार रुपये व नंतर 1 हजाराच्या पटीत 
मुदत ः 3, 5, 8 वर्षे (सिक्‍युअर्ड) व 10 वर्षे (अनसिक्‍युअर्ड) 
व्याजदर ः 8.01 टक्के ते 8.70 टक्के 
2) श्रीराम ट्रान्स्पोर्ट फायनान्स कंपनी लि. 
 
रेटिंग ः “डबल ए प्लस’ 
इश्‍यू खुला ः 6 जानेवारी 2020 
इश्‍यू बंद ः 22 जानेवारी 2020 
(प्रतिसादानुसार आधीही बंद होऊ शकतो.) 
वाटप ः प्रथम येणाऱ्यास प्राधान्य 
किमान गुंतवणूक ः 10 हजार रुपये व नंतर 1 हजाराच्या पटीत 
मुदत ः 3, 5, 7 वर्षे (सिक्‍युअर्ड) 
व्याजदर ः 8.52 टक्के ते 9.10 टक्के 
(ज्येष्ठ नागरिकांना 0.25 टक्के अधिक व्याज) 
व्याज देयता ः मासिक, वार्षिक व संचयी (क्‍युम्युलेटिव्ह) 

अभिप्राय द्या!