प्रत्येक डेट फंड गुंतवणूकदाराने गुंतवणुकीच्या बाबतीत खालील मुद्दे पाहावेत !!
१. गुंतवणूक कालावधी
जर गुंतवणूक कालावधी कमी असेल तर तिथे जास्त जोखीम घेता येत नाही. म्हणून मग अशा वेळी ओव्हरनाईट, लिक्विड, लो डय़ुरेशन, अल्ट्रा शॉर्ट डय़ुरेशन असे फंड योग्य आहेत. परंतु गुंतवणूक कालावधी जर ३ ते ५ वर्षांच्या असेल तर मग मीडियम डय़ुरेशन, कॉर्पोरेट किंवा डायनॅमिक बॉण्ड फंड योग्य असतात.
२. उद्दिष्ट
नियमित मिळकत की जोखीम व्यवस्थापन की नजीकच्या काळातील लक्ष्यपूर्ती? त्यानुसार गुंतवणूक पर्याय निवडायला हवा. सिस्टीमॅटिक विथड्रॉवल प्लॅन अर्थात ‘एसडब्ल्यूपी’मार्फत नियमित मिळकत हवी असेल तर एक वर्षांच्या खर्चाइतके पैसे लिक्विड फंडांमध्ये ठेवावेत. जोखीम व्यवस्थापन असेल तर एखादा चांगला डायनॅमिक बॉण्ड फंड किंवा कॉर्पोरेट बॉण्ड फंड चालेल. आर्थिक उद्दिष्टाची पूर्तता करताना जोखीम कमी किंवा नगण्य असेलेले डेट फंड निवडावेत.
३. जोखीम
व्याज दरांमधील बदल आणि डिफॉल्ट या दोन कारणांमुळे डेट फंडांना नुकसान होतं. तेव्हा फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये कुठल्या रेटिंगची गुंतवणूक आहे आणि एखाद्या इश्युअरवर जास्त कॉन्सन्ट्रेशन आहे का हे तपासणं खूप महत्त्वाचं आहे.
४. परतावा
मुदत ठेवींप्रमाणे डेट फंड कुठल्याही मिळकतीची हमी देत नाहीत. खाली येणाऱ्या व्याज दरांमुळे दीर्घ मुदतीचे फंड बहरतात, तर वाढणाऱ्या व्याज दरांमुळे त्यांना नुकसान होतं. कधी कधी अल्पावधीत रोकडसुलभता कमी झाली तर लिक्विड किंवा लो डय़ुरेशन फंडांमध्ये फायदा होतो.
मुदत ठेवीवर मिळणाऱ्या व्याजावर दर वर्षी कर बसतो. परंतु डेट म्युच्युअल फंडामध्ये जेव्हा आपण पैसे काढतो तेव्हाच कर भरावा लागतो. तीन वर्षांच्या आत पैसे काढल्यास गुंतवणूकदाराच्या स्लॅबनुसार कर लागतो. तीन वर्षांनंतर पैसे काढल्यास ‘इंडेक्सेशन’चा फायदा मिळतो आणि कमीत कमी कर भरावा लागतो.
त्यामुळे आपल्याला पैसे केव्हा लागणार याचा निश्चित अंदाज बांधून आपली गुंतवणूक करावी हे सर्वात महत्वाचे !!