बर्गर किंग इंडिया या रेस्टॉरंट साखळीला बाजारात आयपीओ आणण्यासाठी सिक्युरिटीज अॅंड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाची (सेबी) परवानगी मिळाली आहे. बर्गर किंग इंडियाने आयपीओसाठीच्या मसुद्याचे कागदपत्रे नोव्हेंबर महिन्यात सेबीकडे सादर केले होते. 24 जानेवारीला सेबीने काही अंतिम दुरुस्त्या, निरिक्षणे कंपनीकडे पाठवल्या होत्या. सेबीने यासंदर्भातील माहिती दिली आहे.
कोणत्याही कंपनीला आयपीओ बाजारात आणण्याआधी सेबीकडून देण्यात येणारी निरिक्षणे महत्त्वाची असतात. त्यात आयपीओबद्दलची माहिती, पब्लिक ऑफरवरील फॉलोअप आणि राईट्स इश्यू इत्यादींचा समावेश असतो. आयपीओच्या मसुद्यानुसार बर्गर किंग 400 कोटी रुपयांचा इक्विटी शेअरचा आयपीओ आणणार आहे. त्याद्वारे कंपनीचे प्रवर्तक 6 कोटी इक्विटी शेअर बाजारात आणणार आहेत.
कंपनीच्या विस्तारासाठी आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट कारणांसाठी कंपनी या भांडवलाचा वापर करणार आहे. या आपीओचे व्यवस्थापन कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी, सीएलएसए इंडिया प्रा. लि., एडेलवाईस फायनान्शियल सर्व्हिसेस आणि जे एम फायनान्शियल करणार आहेत. बर्गर किंग इंडियाची नोंदणी बीएसई आणि एनएसई या दोन्हीवर होणार आहे. आयपीओच्या मसुद्यानुसार 30 जून 2019 अखेर कंपनीचे देशभरात 16 राज्ये आणि 47 शहरांमधून 202 रेस्टॉरंट आहे.

अभिप्राय द्या!