कुटुंबाचा अर्थसंकल्प

कुटुंबाचा अर्थसंकल्प म्हणजेच आपल्या सर्व खर्चांचे योग्य नियोजन होय. नोकरी किंवा व्यवसायातील उत्पन्नाचे  प्रभावीपणे नियोजन.

कौटुंबिक अर्थसंकल्प आपण चार महत्त्वाच्या घटकांमध्ये विभागू शकतो – १) दैनंदिन गरजांसाठीचा खर्च २) अल्पकालीन किंवा दीर्घकालीन स्वप्नपूर्तीसाठीचा खर्च ३) दैनंदिन खर्चासाठी बचत ४) दीर्घकालीन योजनांसाठी गुंतवणूक.

आपले अल्पकालीन किंवा दीर्घकालीन ध्येय असे असावे की ते आपल्या आर्थिक क्षमतेच्या आवाक्यात असतील व त्याचा आपल्या नियोजनावर कधीच ताण पडणार नाही. (नवीन वाहन, नवीन घर किंवा मोठे घर, मुलांचे शिक्षण, त्यांचे लग्न तसेच निवृत्तिनियोजन वगैरे आदी झाले अल्पकालीन किंवा दीर्घकालीन खर्च.) स्वप्नपूर्तीसाठी गुंतवणूक करताना आपण भविष्यात होणाऱ्या खर्चाचा बारकाईने अभ्यास करून नियोजन करावयास हवे. उदाहरणार्थ – आपल्याला येत्या चार वर्षांत नवीन वाहन घ्यायचे झाल्यास केवळ वाहनाचे ‘एक्स-फॅक्टरी’ किमतीसाठी नियोजन करून चालणार नाही. आपल्याला वाहनाचे ‘डाऊन पेमेंट’, मासिक हप्ता, नोंदणी, वाहनाचा विमा, पेट्रोल वा डिझेल,आणि नियमित वाहनाचे देखभाल आदी सर्व खर्चाचा आपल्या आर्थिक नियोजनात अंतर्भाव करावा लागेल. अशा पद्धतीने योग्य व सविस्तर नियोजन केल्यास आपल्यावर घरी हत्ती पाळण्याची वेळ येण्याची भीती राहात नाही.

दैनंदिन खर्चाचे प्रभावी नियोजन कसे ?

महिन्यातील खर्चाची यादी बनवावी. त्यात नियमित खर्च (जसे विजेचे/दूरध्वनी-भ्रमणध्वनी/स्वयंपाकाचा गॅस आदींचे देयक वगैरे) तसेच अनियमित खर्च (जसे खरेदी, खानपान, पर्यटन वगैरे) भागवण्याकरिता बचतीची आवश्यकता असते. त्यासाठी आपण बँकेचे बचत खाते, आवर्ती जमा खाते (आरडी) किंवा म्युच्युअल फंडाचे लिक्वि ड फंड आदींमध्ये बचत करू शकतो. तसेच खरेदीला जाताना आपली खरेदीची यादी जवळ बाळगावी. आजच्या ‘मॉल’ संस्कृतीमध्ये बऱ्याच वेळेला आपण अनावश्यक गोष्टी अधिक प्रमाणात खरेदी करत असतो. आपल्या दैनंदिन खर्चाचा आढावा दर तीन-चार महिन्यांनी घ्यावा. यामुळे आपल्या खर्चावर योग्य नियंत्रण ठेवण्यास मदत होते. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे

आपल्या दीर्घकालीन स्वप्नपूर्तीसाठी गुंतवणूक करण्याकरिता ठरावीक रक्कम बाजूला काढणे व उरलेल्या रकमेत आपले दैनंदिन खर्च भागविले पाहिजेत.

जीवन विमा व आरोग्य विमा

कुटुंब प्रमुखाचा मोठय़ा रकमेचा मुदतीचा विमा असणे अतिशय महत्त्वाचे आहे. मुदतीच्या विम्यात कमी हप्त्यात अधिक विमा कवच मिळते. त्यामुळे विमा हप्त्याची तरतूद अत्यावश्यक आहे. तसेच घरात कधी काही मोठे आजारपण आले तर आपल्या नियोजनावर त्याचा भार पडतो व आपले अर्थसंकल्प कोलमडू शकते. पूर्ण कुटुंबाच्या आरोग्य विम्याची तरतूद केल्याने असे खर्च विमा कंपनी उचलते.

जेव्हा आपण अल्पकालीन तसेच दीर्घकालीन ध्येय किंवा ठराविक उद्दिष्टे ठरवितो तेव्हा त्या उद्दिष्टपूर्तीसाठी कोणत्या प्रकारची गुंतवणूक योग्य ठरेल ते आपण आपल्या नियोजनातून ठरवू शकतो. आपले दैनंदिन खर्च भागविण्यासाठी आपण बँकेच्या बचत खात्याचा उपयोग करू शकतो. आपल्या वेगवेगळ्या कालावधीच्या उद्दिष्टांसाठी आपण म्युच्युअल फंडच्या भिन्न योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतो. उदाहरणार्थ – १) एक वर्षांनंतर नवीन दूरचित्रवाणी संच घ्यायचा असेल तर म्युच्युअल फंड च्या ‘अल्ट्रा शॉर्ट टर्म’ गटवारीतील फंडांमध्ये गुंतवणूक करावी. २) ३ ते ४ वर्षांनंतर नवीन वाहन घ्यायचे असेल तर त्यासाठी म्युच्युअल फंडाच्या ‘हायब्रीड’ श्रेणीतील फंडांमध्ये गुंतवणूक करावी. ३) मुलांचे उच्च शिक्षण/निवृत्तिजीवन या सारख्या १५ ते २० वर्षांनंतरच्या स्वप्नपूर्तीसाठी म्युच्युअल फंडच्या ‘इक्विटी’ गटवारीत गुंतवणूक करावी. योग्य योजनांचे संयोजन करण्यासाठी आपले आर्थिक सल्लागार आपल्याला योग्य मार्गदर्शन करतात.

म्युच्युअल फंडाची एसआयपी आपल्याला कुटुंबाच्या अर्थसंकल्पात मदत करतात. दरमहा आपण आपल्या एसआयपीसाठी ठराविक रक्कम बाजूला काढली की उरलेल्या रकमेत आपल्याला दैनंदिन खर्च भागवायचे असतात. त्यामुळे आपोआप आपण शिस्तबद्ध होतो व आपल्या अनावश्यक खर्चाला आळा बसतो.

आणि या सर्व बाबी विस्तृतपणे समजण्यासाठी तज्ञ सल्लागाराचे मार्गदर्शनही महत्वाचे असते ! आपण त्यासाठी आमच्या पाटील tower येथील कार्यालयाला भेटही देऊ शकता !!

अभिप्राय द्या!