एसबीआय म्युच्युअल फंड देशातील सर्वात मोठी म्युच्युअल फंड कंपनी बनली आहे. एचडीएफसी एएमसीला मागे टाकत एसबीआय म्युच्युअल फंडाने नंबर वनची जागा पटकावली आहे. डिसेंबर 2019 मध्ये तिसऱ्या क्रमांकावर असणारी एसबीआय म्युच्युअल फंड कंपनी मुसंडी मारत जानेवारी महिन्यात पहिल्या क्रमांकावर पोचली आहे. त्यामुळे आता देशातील सर्वाधिक म्युच्युअल फंड गुंतवणूक एसबीआय म्युच्युअल फंडाच्या पंखाखाली आहे. 
 
एसबीआय एमएफच्या व्यवस्थापनखालील एकूण गुंतवणूक जानेवारीअखेर 3.82 लाख कोटी रुपयांवर पोचली आहे. तर याच कालावधीत एचडीएफसी एएमसीच्या व्यवस्थापनाखालील एकूण गुंतवणूक 3.79 लाख कोटी रुपये इतकी आहे. 3.68 लाख कोटी रुपयांच्या एकूण गुंतवणूकीसह आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एमएफ तिसऱ्या क्रमांकावर आहे. एसबीआय एमएफ याआधीच देशातील सर्वात मोठी इक्विटी गुंतवणूक असलेली म्युच्युअल फंड कंपनी आहे. कंपनीच्या इक्विटी योजनांमध्ये असलेली एकूण गुंतवणूक 1.93 लाख कोटी रुपये इतकी आहे. तर कंपनीच्या डेट योजनांमध्ये 1.63 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झालेली आहे.
 
जानेवारी महिन्यात एसबीआय एमएफमधील गुंतवणूकीत 21,000 कोटी रुपयांची भर पडली आहे. यात इक्विटी प्रकारात 3,000 कोटी रुपयांची तर डेट प्रकारात 15,000 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. एसबीआय एमएफच्या एकूण 695 म्युच्युअल फंड योजना बाजारात आहेत. यातील 334 ओपन एंडेड आणि 361 क्लोज एंडेड प्रकारातील योजना आहेत.

अभिप्राय द्या!