कोणत्या वजावटीसाठी कोणते पुरावे सादर करावे यासाठी प्राप्तिकर कायद्यात नियम आखून दिलेले आहेत. या वजावटी घेण्यासाठी कर्मचाऱ्याने फॉर्म १२ बीबी कंपनीला पुराव्यासोबत सादर करावा लागतो. काही प्रमुख वजावटीसाठीचे पुरावे खालीलप्रमाणे :

घर भाडे भत्ता (एचआरए) : करदात्याला पगारातून घरभाडे भत्ता मिळत असेल आणि तो भाडय़ाच्या घरात राहात असेल तर या कलमाद्वारे घरभाडे भत्त्याची (इतर अटींची पूर्तता केल्यास) वजावट घेता येते. ही वजावट घ्यावयाची असल्यास करदात्याने कंपनीला भाडे करार, भाडे पावत्या, घरमालकाचा ढअठ (घरभाडे एक लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर) इत्यादी पुरावे सादर करावेत.

रजा प्रवास सवलत (एलटीसी) : ज्या करदात्यांना ‘एलटीसी’ची सवलत घ्यावयाची आहे, त्यांनी प्रवासाची बिले आणि पावत्या कंपनीला द्याव्या.

*गृह कर्जावरील सवलत : यामध्ये ‘कलम २४’नुसार गृह कर्जावरील व्याजाची वजावट आणि ‘कलम ८० सी’नुसार मुद्दल परतफेडीच्या वजावटीचा समावेश होतो. ज्या बँकेकडून किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतले आहे त्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडून व्याज आणि मुद्दल परतफेडीचे प्रमाणपत्र घेणे गरजेचे आहे. हे प्रमाणपत्र ३१ मार्चपर्यंतच्या व्याजाचे आणि मुद्दल परतफेडीचे असले पाहिजे. परंतु असे प्रमाणपत्र ३१ मार्चपूर्वी देता येत नसल्यामुळे, अशा संस्थांकडून अस्थायी (प्रोव्हिजनल) प्रमाणपत्र घेऊन कंपनीला सादर करता येते. या दोन्ही कलमानुसार वजावटी घराचा ताबा घेतल्यानंतरच घेता येतात.

मेडिक्लेम आणि वैद्यकीय खर्च (कलम ८० डी): या कलमानुसार मेडिक्लेम विमा हप्त्याची पावती आणि वैद्यकीय खर्च आणि तपासणीची बिले आणि पावत्या कंपनीला सादर कराव्यात.

‘कलम ८० सी’ खालील गुंतवणुका आणि खर्च : या कलमानुसार केलेल्या गुंतवणुका आणि खर्चाच्या पावत्या जमा करून कंपनीला सादर कराव्या. प्रत्यक्ष गुंतवणूक किंवा खर्च केल्यावरच या कलमानुसार वजावट घेता येते. या कलमानुसार प्रामुख्याने गृह कर्जाची मुद्दल परतफेड, शाळेची फी, विमा हफ्ता, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम, पोस्टाच्या योजनांमधील गुंतवणूक आदींचा समावेश होतो.

राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस) : करदाता ज्या कंपनीत नोकरी करतो अशा कंपनीने कॉर्पोरेट राष्ट्रीय पेन्शन योजना घेतली असेल तर या योजनेत कंपनी करदात्याच्या वतीने पैसे भरते. त्याची माहिती कंपनीकडे असते, परंतु, करदात्याने या व्यतिरिक्त ‘एनपीएस’मध्ये पैसे भरले असल्यास त्याची माहिती करदात्याने कंपनीला द्यावी.

 घर भाडे (कलम ८० जीजी): ज्या करदात्यांना घरभाडे भत्ता मिळत नाही, ज्यांचे स्वतचे घर नाही आणि जे भाडय़ाच्या घरात राहतात अशांना दरमहा ५,००० रुपयांपर्यंत वजावट उत्पन्नातून मिळू शकते. अशांनी ‘फॉर्म १० बीए’नुसार घोषणापत्र सादर केले पाहिजे.

जे कर्मचारी कंपनीने निश्चित केलेल्या मुदतीत गुंतवणूक आणि खर्चाचे पुरावे सादर करू शकणार नाहीत किंवा त्या वेळेत गुंतवणूक करू शकणार नाहीत त्यांनी ३१ मार्चपूर्वी गुंतवणूक किंवा खर्च करून ती वजावट विवरणपत्र भरताना विचारात घेऊन कर परताव्याचा (रिफंड) दावा करावा. परंतु ‘एलटीसी’सारखी वजावट फक्त कंपनीलाच विचारात घेता येते.

जे करदाते पगारदार नाहीत त्यांनी गुंतवणूक आणि खर्च ३१ मार्चपूर्वी करणे गरजेचे आहे. अगदी शेवटच्या घटकेपर्यंत न थांबता त्या आधीच गुंतवणूक करावी जेणेकरून योग्य त्या प्रकारातच गुंतवणूक होइल. बऱ्याचदा असे घडते गुंतवणुकीचा शेवटचा दिवस आलेला असतो आणि करदात्यासाठी अयोग्य असणाऱ्या विमा योजनेत किंवा ‘ईएलएसएस’मध्ये पैसे गुंतविले जातात. त्यामुळे ज्या करदात्यांनी अद्याप गुंतवणूक केलेली नाही त्यांनी त्याचा अभ्यास करून योग्य प्रकारात गुंतवणूक करावी.

अभिप्राय द्या!

Close Menu