मागील वर्षभरात शेअर बाजारातील अनिश्चितेने दिग्गज कंपन्यांना संघर्ष करावा लागला आहे. मंदीने अनेकांच्या आर्थिक कामगिरीवर परिणाम झाला असला तरी काही कंपन्यांनी मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीत गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत खूश केले आहे. अशाच एका शेअरने वर्षभरात ७७ टक्के वाढ नोंदवली असून यातील तेजी अद्याप कायम आहे. या कंपनीची मजबूत आर्थिक स्थिती लक्षात घेता भविष्यात हा शेअर आणखी वधारेल, असा अंदाज शेअर बाजार विश्लेषक व्यक्त करत आहेत.
‘टाटा ग्लोबल बेव्हरेज’ या शेअरने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. टाटा समूहातील उपकंपनी असलेल्या ‘टाटा ग्लोबल बेव्हरेज’ने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. मागील तीन वर्षात या शेअरने २०२ टक्के परतावा दिला आहे. चालू वर्षात आजच्या सत्रापर्यंत ‘टाटा ग्लोबल बेव्हरेज’ ने २२.६ टक्के वाढ नोंदवली आहे. १५ जानेवारी रोजी हा शेअर ३९५.७५ रुपये होता. हा त्याचा रेकॉर्ड स्तर होता. १५ जानेवारी रोजी ‘आनंद राठी स्टोक ब्रोकर्स’ने या शेअरला ‘खरेदी’चा सल्ला दिला आहे. यासाठी ४७३ रुपये लक्ष्य ठेवले आहे.