आपल्या देशामध्ये आपण आधीच मंदीसदृश वातावरणाचा अनुभव घेत आहोत. अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर हा प्रत्येक तिमाहीत खाली येताना दिसत आहे, त्यात आता हे करोना संकट.

जर हे संकट वेळीच आटोक्यात नाही आले तर आपण मंदीच्या विळख्यात लवकरच सापडू असे वाटणे चुकीचे नाही. आज आपल्या शेअर बाजाराने  आठवडय़ाभरात जरी दहा ते बारा टक्के नुकसान करून घेतले आहे आणि त्यात अजूनही वाढ होऊ शकेल अशी दाट शक्यता आहे.

बऱ्याच भारतीय कंपन्या फारशी चांगली कामगिरी दाखवत नव्हत्या, परंतु सरकारने कराचे दर कमी केल्यामुळे त्यांना थोडा फायदा झाला. पण आपल्या देशातील ऑटो, इलेक्ट्रॉनिक्स, फार्मा आणि ग्राहकोपयोगी वस्तू बनविणाऱ्या कंपन्या ज्या प्रमाणात चीनवर विसंबून आहेत, त्या प्रमाणात चीनकडे निर्यात होणाऱ्या वस्तू कमी आहेत. तरीही देशातील ३४ टक्के पेट्रोकेमिकल हे चीनला विकले जातात. एकूणच आपल्या देशातील कंपन्यांच्या नफ्यावर आणि त्यात करून चालू आर्थिक वर्षांच्या शेवटच्या तिमाहीच्या कामगिरीवर नक्कीच नकारात्मक परिणाम होतील. तेव्हा येणाऱ्या काळात शेअर बाजाराकडे जास्त लक्ष ठेवून गुंतवणूक करावी लागणार.

एका बाजूला संकट म्हटले की दुसऱ्या बाजूला संधीसुद्धा असतेच.

तेव्हा एक गुंतवणूकदार म्हणून जेव्हा मी या सगळ्या पडझडीकडे पाहतो  तेव्हा मला दोन गोष्टी प्रकर्षांने जाणवतात – पहिली, पोर्टफोलिओमध्ये झालेल्या फायदा काढून घेऊन रक्कम सुरक्षित करणे आणि दुसरी जेव्हा संधी मिळेल तेव्हा निवडक भरवशाच्या कंपन्यांमध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे.

म्हणून मी माझ्या संपूर्ण पोर्टफोलिओचे विश्लेषण करून, कोणत्या गुंतवणुकीतून बाहेर पडायचं, कुठल्या शेअरवर नजर ठेवून कमी किमतीत गुंतवणूक करायची आणि नव्याने पुन्हा एकदा पोर्टफोलिओ कसा तयार करायचा हे ठरविले आहे. मात्र माझ्या आवडीच्या म्युच्युअल फंडातील ‘एसआयपी’मध्ये मी गुंतवणूक चालू ठेवणार. कारण ती माझ्या दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी आहे.

परंतु ज्या गुंतवणूकदारांना येत्या काळाची भीती झेपत नसेल, त्यांनी गुंतवणुकीतून बाहेर पडावे. अर्थात हे सर्व करताना कर दायीत्व आणि एग्झिट लोड यांसारख्या गोष्टींवरसुद्धा लक्ष ठेवायला हवे. नजीकच्या काळातील खर्चाची तरतूद जर योग्यप्रमाणे झालेली असेल तर मग बाजारातील पडझडीचा फारसा त्रास होत नाही.

आणि मागील १५-२० वर्षांचा काळ पाहिला तर अशी अनेक संकटे या आधीसुद्धा आली होती आणि त्यातून पुढे शेअर बाजार वधारले. तेव्हा योग्य आर्थिक नियोजन करून अशा संकटातून मिळणाऱ्या संधींचा नक्कीच उपयोग करून घेता येतो. अर्थात यात जोखीम घटक आहेच आणि तशी जोखीम घ्यायची क्षमता असेल तर आत्ताच काही equity फंडामध्ये आपली गुंतवणूक STP द्वारे करावी आणि

या संकटाचे संधीत रुपांतर करावे !!

अभिप्राय द्या!