गुंतवणुकीवर मिळणारा परतावा म्हणजे त्यावर मिळणारे “व्याज’. यावर तुमच्या संपत्तीत होणारी वाढ अवलंबून असते. हे परताव्याचे गणित सर्रास सरळ व्याज पद्धतीने मोजण्याचा सर्वांत सोपा मार्ग अवलंबिला जातो. समजा, वार्षिक 10 टक्के व्याजदराने 100 रुपये ठेव योजनेत गुंतविले, तर सरळ व्याज पद्धतीने लाभाचे सोपे गणित मांडताना एक वर्षानंतर तुमच्या मुद्दलावर परतावा म्हणून 10 रुपये मिळतील. पुढील वर्षीदेखील तुम्हाला 10 रुपये मिळतील. या पद्धतीने तुम्ही जितक्‍या कालावधीसाठी मुदतठेव केली असेल, तितक्‍या कालावधीसाठी तुम्हाला हे व्याज मिळेल. मात्र, त्यात वार्षिक 10 रुपयांचीच भर पडेल, म्हणजेच येथे ज्या रकमेवर व्याज मोजले आहे ती रक्कम, अर्थात मुद्दल तिन्ही वर्षांत एकसारखीच धरली आहे. 
 
बहुतांश वित्तीय योजनांमध्ये “पॉवर ऑफ कम्पाउंडिंग’चे म्हणजेच चक्रवाढ व्याजाचे तत्त्व लागू आहे. चक्रवाढ व्याज म्हणजे प्रारंभिक गुंतवणूक मुद्दलावर व्याज मोजले जाण्यासह, त्यापुढे या रकमेत समाविष्ट होणाऱ्या व्याज रकमेचेदेखील व्याज मोजण्याची पद्धत आहे. म्हणजेच व्याजावर व्याज मोजले जाते. सुरुवातीला दिलेल्या उदाहरणाला आपण पुन्हा एकदा लक्षात घेऊ. पहिल्या वर्षी तुम्हाला 10 रुपये व्याज मिळाल्यानंतर तुमचे भांडवल 110 रुपये होईल आणि त्यामुळे त्यापुढील वर्षी तुम्हाला 110 रुपयांवर 10 टक्के व्याज देण्यात येईल अर्थात ते 11 रुपये असेल, त्यामुळे तुमचे भांडवल 121 रुपये इतके होईल आणि त्यानंतरच्या वर्षी तुम्हाला मिळणारे व्याज 12.1 रुपये असेल. सरळ व्याज पद्धतीने जर तुम्ही 10 वर्षांसाठी मुदतठेवीत पैसे गुंतवले तर तुम्हाला 100 रुपयांच्या भांडवलावर 100 रुपयेच मिळतील. मात्र चक्रवाढ पद्धतीने व्याज लागू केल्यास तुम्हाला व्याजापोटी 160 रुपये मिळतील.
यालाच म्हणतात “पॉवर ऑफ कम्पाउंडिंग’ची जादू !!
 

अभिप्राय द्या!