वर्षभरातील सर्व आर्थिक कामे पूर्ण करण्याची शेवटची मुदत ३१ मार्च २०२० होती. मात्र दोन आठवड्यात सध्या देशभर ‘करोना’चा प्रादुर्भाव झाल्याने लॉकडाउनची समस्या निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आर्थिक कामे पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत वाढवून देण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज दिल्लीत केली.
पॅन क्रमांक आधार क्रमांका जोडण्यासाठी आता ३० जूनपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. आता नागरिकांना ३० जूनपर्यंत अतिरिक्त मुदत मिळाली आहे. सरकारने व्यावसायिकांना देखील दिलासा दिला आहे. मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचे जीएसटी रिटर्न आता ३० जूनपर्यंत सादर करता येणार आहेत. ५ कोटींहून कमी उलाढाल असलेल्या कंपन्यांना विलंब आकार आणि दंड माफ करण्यात आला आहे. त्यापुढील उलाढाल असलेल्या कंपन्यांना ९ टक्के व्याज आकारले जाईल, असे सीतारामन यांनी सांगितले.