क्रेडिट कार्ड देयकासह, कर्जाचे हप्ते विलंबाने फेडण्याची ही केवळ मुभा आहे, मासिक हप्तामाफी नाही, हे कर्जदारांनी स्पष्टपणे ध्यानात घ्यायला हवे. शिवाय रिझव्‍‌र्ह बँकेने (तीन महिने) मासिक हप्ता स्थगितीसंबंधी काढलेल्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे की, स्थगिती कालावधीतही थकीत कर्जावरील व्याजाची रक्कम जमा होतच राहील, ज्याची पुढे जाऊन (मेनंतर) परतफेड करणे कर्जदारांना क्रमप्राप्तच आहे.

याचा अर्थ कर्जदाराला स्थगिती कालावधी संपल्यानंतर अतिरिक्त व्याजाची रक्कम भरावी लागेल. म्हणजे फेब्रुवारी २०२० अखेरीस असलेले एकूण थकीत कर्ज हे मे २०२० अखेरीस त्याच स्तरावर राहणार नाही. तर मध्यंतरीच्या तीन महिन्यात न फेडलेल्या मासिक हप्त्याच्या व्याज रकमेची त्यात भर पडलेली असेल. कर्जाचा मुदत कालावधी आणि रक्कम जितकी अधिक तितका हा वाढीव व्याज भुर्दंड अधिक असेल.

एका बँकप्रमुखाने नाव न छापण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीप्रमाणे, मासिक हप्त्याच्या स्थगितीचा परिणाम हा कर्जफेडीच्या वेळापत्रक लांबण्यात प्रतिबिंबीत होईलच. मात्र तीन हप्ते लांबणीवर टाकल्याची भरपाई ही भविष्यात अतिरिक्त तीन हप्ते वसुलीने होणार नाही. तर त्यासाठी पाच किंवा सहा अतिरिक्त हप्तेही प्रसंगी कर्जदाराला द्यावे लागतील. त्यामुळे मासिक हप्त्याच्या स्थगितीसाठी खातेदारांची पूर्वसंमतीची खासगी बँकांची पद्धत ही स्टेट बँकेच्या तुलनेत महत्वाची आणि हितावह असल्याचेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

अभिप्राय द्या!