केंद्रीय अर्थसंकल्पात प्राप्तिकर विवरणपत्र भरताना नवा व जुना असे दोन पर्याय देण्यात आल्यामुळे आपल्यापैकी बहुतांश लोक हा नक्कीच विचार करत असतील की
आपण कोणती कर प्रणाली निवडावी?
आपल्या विद्यमान प्राप्तिकराच्या रचनेतील (जुनी प्रणाली) करदरांमध्ये काही सवलतीदेखील देण्यात आल्या आहेत. उदाहरणार्थ, घरभाडे भत्ता (House Rent Allowance), भविष्य निर्वाह निधी (PF), विमा, म्युच्युअल फंड ईएलएसएस इत्यादीसारख्या विविध सवलती आणि गुंतवणूकींचा लाभ घेऊन कर कमी करण्याचे बरेच मार्ग आहेत. दुसरीकडे, नव्या करप्रणालीमध्ये प्राप्तिकर दर नक्कीच कमी आहेत. पण करदात्याला काही विशिष्ट सवलती आणि त्यामुळे मिळणारी करांमधील सूट उपलब्ध नसेल.
आपल्यापैकी सर्वजण करसवलतीचा लाभ घेण्यासाठी आयुर्विमा, ईएलएसएस, आरोग्य विमा, इत्यादींमध्ये दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करतो. आपण गृहकर्ज आणि त्यावरील व्याज यांचाही करबचतीसाठी लाभ घेतो. आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की, नवीन कर योजनेंतर्गत अशा सर्व गुंतवणुकींचा लाभ घेता येणार नाही.
नवीन करप्रणाली खालील लोकांना फायदेशीर आहे.
असे सर्व करदाते जे करबचतीसाठी कुठलीही गुंतवणूक करत नाहीत.
नवीन नोकरी करणारे तरुण ज्यांची विमा पॉलिसी आणि इतर कर बचतीची गुंतवणूक त्यांच्या पालकांकडून केली जाते.
अधिक उत्पन्न असलेल्यांना या नव्या प्रणालीचा नक्कीच फायदा होईल. परंतु मध्यम उत्पन्न गटासाठी, नवी की जुनी करप्रणाली, हा निर्णय डोळे झाकून घेणं शक्य नाही. त्यांनी आपले वार्षिक उत्पन्न आणि गुंतवणूक याचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. तसेच, दोन्ही पर्यायांतर्गत करांची तुलना करण्यासाठी, प्राप्तिकर विभागाच्या संकेतस्थळावर (https://www.incometaxindiaefiling.gov.in/Tax_Calculator/) कर कॅल्क्युलेटर देखील उपलब्ध आहे.