टाटा समूहातील आघाडीची कंपनी, टाटा स्टील नॉन कन्व्हर्टीबल डिबेंचर्सच्या (एनसीडी) माध्यमातून ७,००० कोटी रुपयांचे भांडवल उभारणार आहे. प्रायव्हेट प्लेसमेंटच्या माध्यमातून एक किंवा अधिक टप्प्यात एनसीडीद्वारे हे भांडवल उभारले जाणार आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने सध्या उपलब्ध करून दिलेल्या चलन तरलतेचा लाभ घेण्यासाठी टाटा स्टील हे एनसीडी बाजारात आणणार आहे. 
 
टाटा स्टीलच्या संचालक मंडळाच्या १३ एप्रिल २०२० पार पडलेल्या बैठकीत एनसीडी आणण्यास परवानगी देण्यात आली. प्रत्येकी १० लाख रुपयांचे एनसीडी टाटा स्टील आणणार आहे. कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाच्या काळात वित्तीय स्थैर्य राखण्यासाठी आरबीआयने खुल्या बाजारातील प्रक्रियेद्वारे १,००,००० कोटी रुपयांचे कर्जरोखे दोन टप्प्यात बाजारातून विकत घेण्याची घोषणा मागील महिन्यात केली होती. त्याचाच लाभ घेत कंपनीत वित्तीय स्थैर्य राखण्यासाठी आणि कर्ज कमी करण्यासाठी  हे एनसीडी आणले जाणार आहेत. डिसेंबर २०१९ अखेर टाटा स्टीलवर १,०९,८६७ कोटी रुपयांचे एकूण कर्ज तर १,०४,६२८ कोटी रुपयांचे निव्वळ कर्ज आहे.
 
याआधी रिलायन्स इंडस्ट्रीजनेसुद्धा एनसीडीच्या माध्यमातून २५,००० कोटी रुपयांचे भांडवल उभारण्याची घोषणा केली आहे.

अभिप्राय द्या!