प्राप्तिकर विभागाने आर्थिक वर्ष २०१९-२० साठी भरायच्या कर विवरणपत्राचे अर्ज अद्याप उपलब्ध करून दिलेले नाहीत. या अर्जाची अधिसूचिना चालू महिनाअखेर काढली जाणार आहे. त्यानंतर ऑनलाइन प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची सुविधा ३१ मे पर्यंत उपलब्ध होईल, असे प्राप्तिकर विभागाने कळवले आहे. यामुळे करदात्यांना विवरणपत्रात भरायच्या तपशीलाचा विचार करण्यास अवधी मिळणार आहे.
केंद्र सरकारने कोविड-१९ संसर्गामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता आर्थिक तपशीलाबाबत लवचिक धोरण अवलंबले आहे. यामुळे विवरण अर्जांची पुनर्रचना करण्यात येत आहे. करदात्यांना ३० जूनपर्यंत मिळालेल्या मुदतवाढीचा लाभ घेता यावा यादृष्टीने विवरण अर्जांत सुधारणा करण्यात येत आहे. यामुळे १ एप्रिल २०२० ते ३० जून २०२० या काळातील व्यवहारांवरही करदात्यांना करलाभ मिळवता येणार आहे. एकदा नव्या विवरणपत्र अर्जांची अधिसूचना जारी झाल्यानंतर प्राप्तिकर विभाग आपल्या संगणकीय प्रणालीमध्ये तसे बदलही करणार आहे. त्यामुळे ऑनलाइन विवरणपत्र भऱताना करदात्यांना कुठलीही समस्या निर्माण होणार नाही.