राईट्स इश्यू म्हणजे काय?
शेअर बाजारात नोंदणीकृत असलेल्या कंपन्यांसाठी भांडवल उभारणी करण्यासाठी इक्विटी आणि डेट प्रकारातील साधने उपलब्ध असतात. राईट्स इश्यू हा इक्विटी प्रकारातील एक पर्याय आहे. राईट्स इश्यू प्रक्रियेत फक्त विद्यमान शेअरधारकांनाच कंपनीचे नवीन शेअर खरेदी करण्याची संधी दिली जाते. या प्रक्रियेत गुंतवणूकदारांना नवीन शेअर खरेदी करताना बाजारात शेअर व्यवहार करत असलेल्या किंमतीत सवलत (डिस्काउंट) दिली जाते. रिलायन्स इंडस्ट्रीजचा नवीन शेअर १२५७ रुपयांना मिळणार आहे.  ३० एप्रिल रोजी कंपनीचा शेअर एनएसईवर १४६० रुपयांवर बंद झाला होता. त्यानुसार चालू बाजार भावानुसार शेअर धारकांना १४ टक्क्यांचा म्हणजेच २१० रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. परंतु या राईट्स इश्यूची तारीख जाहीर झालेली नसल्याने आणि त्या तारखेदरम्यान कपंनीच्या शेअरमध्ये चढ -उतार झाल्यास त्यानुसार शेअरधारकांना लाभ मिळणार आहे.
 
राईट्स इश्यू आणण्यामागचे नेमके कारण काय?
वर नमूद केल्याप्रमाणे भांडवलाची उभारणी करण्यासाठी कंपनीने राईट्स इश्यू आणला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी मार्च २०२१ पर्यंत कंपनीला ‘नेट डेट फ्री / कर्जमुक्त’ बनविण्याचे ध्येय ठेवले आहे. त्यानुसार भांडवल उभारणी करण्यासाठी कंपनी वेगवेगळ्या योजना आखत आहे. नुकताच फेसबुक आणि जिओ दरम्यान झालेला करार हा त्याचाच एक भाग होता. फेसबुक – जिओ कराराच्या माध्यमातून कंपनीने ४३,५७४ कोटी रूपयांच्या भांडवलाची उभारणी केली आहे, तर आता राईट्स इश्यूच्या माध्यमातून ५३,१२५ कोटी रूपयांचे भांडवल उभारले जाणार आहे. चालू स्थितीत कंपनीवर १.६१ लाख कोटी रूपयांचे निव्वळ कर्ज आहे. त्यामुळे हे कर्ज संपविण्याच्या दृष्टीने रिलायन्स वेगाने पावले उचलत आहे.
 
शेअरधारकांना नेमका फायदा काय?
राईट्स इश्यू प्रक्रियेत विद्यमान गुंतवणूकदारांना तीन पर्याय उपलब्ध असतात. १) विद्यमान गुंतवणूकदार या प्रक्रियेत भाग घेऊ शकतात.
२) त्याग / रिनाउन्स करू शकतात.
३) प्रक्रियेत भाग न घेणे.
पहिल्या पर्यायानुसार विद्यमान शेअरधारकांना कंपनीचा शेअर खरेदी करण्यासाठी १४ (३० एप्रिलच्या बाजारभावानुसार) टक्क्यांची सवलत मिळणार आहे.
या प्रक्रियेत दुसरा पर्याय सर्वांत महत्त्वाचा आहे. ज्या विद्यमान शेअरधारकांना नवीन शेअर खरेदी करायचे नाहीत, परंतु याचा फायदा घ्यायचा आहे ते शेअरधारक त्यांच्या वाट्याला येणारे शेअर दुसऱ्या गुंतवणूकदारांना विकू शकतात. अधिकृतरित्या त्यासाठी त्यांना काही रक्कम देखील मिळू शकते. उदा. जर कंपनीने १४ टक्क्यांचा डिस्काउंट जाहीर केला आहे, तर विद्यमान शेअरधारक त्यांचा अधिकार नवीन गुंतवणूकदाराला ७-८ टक्के सवलत देऊन विकू शकतात. त्यामुळे दोघांनाही याचा फायदा होईल.
तिसऱ्या पर्यायानुसार विद्यमान शेअरधारक या संपूर्ण प्रक्रियेकडे दुर्लक्ष करून जी गुंतवणूक आहे ती कायम ठेवू शकतो.
 
भारतीय शेअर बाजारातील सर्वांत मोठा राईट्स इश्यू
रिलायन्स इंडस्ट्रीज भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वांत मोठा ५३,१२५ कोटी रुपयांचा राईट्स इश्यू आणत आहे. याअगोदर देखील २९ वर्षांपूर्वी  म्हणजे १९९१ मध्ये सिक्युअर्ड नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्सच्या (एनसीडी) माध्यमातून २६५ कोटी रुपयांचा राईट्स इश्यू आणला होता. त्यावेळी प्रत्येक ६ शेअरमागे १०० रुपयांचा १ डिबेंचर इश्यू करण्यात आला होता.
 
रिलायन्स ‘नेट डेट फ्री / निव्वळ कर्जमुक्त’ होणार म्हणजे नेमके काय?
कंपनीवर असलेल्या एकूण कर्जातून (ग्रॉस डेट) कंपनीकडे उपलब्ध असलेली रोकड आणि रोकडसदृश रक्कम त्यातून वजा केली जाते. राहिलेल्या कर्जाला ‘नेट डेट’ असे म्हणतात. रिलायन्स इंडस्ट्रीजवर एकूण ३.३६ लाख कोटी रूपयांचे कर्ज आहे, तर कंपनीकडे एकूण १.७५ लाख कोटींची रोकड स्वरूपात मालमत्ता आहे.  त्यामुळे कंपनीला नेट डेट फ्री होण्यासाठी १.६१ लाख कोटी रूपयांच्या कर्जाची तरतूद करावयाची आहे. यामुळे कंपनीवर कर्ज असेल परंतु ते उपलब्ध रोख स्वरूपातील मालमत्तेपेक्षा कमी असणार आहे.
 
अंबानी कुटुंब स्वतः विकत घेणार ५०.०३ टक्के
कंपनीने आणलेल्या ५३,१२५ कोटी रुपयांच्या राईट्स इश्यूपैकी ५०.०३ टक्के हिस्सा मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंबीय विकत घेणार आहेत. तर ४९.७७ टक्के हिस्सा २० लाखांपेक्षा जास्त असलेल्या रिटेल शेअरधारकांसाठी आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे रिटेल किंवा संस्थात्मक गुंतवणूकदारांनी जर यात रस दाखविला नाही तर त्यांच्या हिश्श्याच्या राईट्सची खरेदी करण्याची तयारी मुकेश अंबानी यांनी ठेवली आहे. यामुळे कंपनीतील अंबानी कुटुंबीयांचा हिस्सा देखील वाढणार आहे. 

अभिप्राय द्या!