सुकन्या समृद्धी योजना ही सरकारची स्मॉल डिपॉझिट स्कीम आहे. मुलींसाठी ही योजना सर्वात लोकप्रिय असून सरकारने ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ या अंतर्गत ही योजना सुरू केली होती.
या योजनेनुसार पालक आपल्या मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नाच्या खर्चासाठी पैसे जमा करू शकतात. मुलगी २१ वर्षाची होईपर्यंत परतावा म्हणून मोठी रक्कम मिळू शकते. सध्याच्या नियमानुसार जर मुलगी लहान असताना यात गुंतवणूक करण्यास सुरूवात केल्यास तर १५ वर्ष गुंतवणूक करता येते.
सुकन्या समृद्धी योजनेवर सध्या ८.४ टक्के इतका व्याज दर दिला जात आहे. या योजनेत गुंतवणूक करताना जो व्याज दर असतो तोच पूर्ण कालावधी संपेपर्यंत मिळतो. त्यामुळे तुम्ही जर आता (एप्रिल ते जून २०२०) या कालावधीत खाते सुरू केले असेल तर ८.४ टक्के इतका व्याज दर मिळतो.
एखाद्या आई-वडिलांनी मुलीचे वय एक वर्ष असताना प्रत्येक महिन्याला या योजनेत १२ हजार ५०० रुपये जमा केले तर वर्षाला १.५ लाख इतके होतात. मुलीचे वय २१ वर्ष होईपर्यंत ६३.७ लाख रुपये जमा होतील. यातील २२.५ लाख ही तुमची गुंतवणूक असेल तर ४१.२९ लाख हे व्याज असेल. म्हणजेच यातील ३५.२७ टक्के रक्कम ही तुमची गुंतवणूक रक्कम तर ६४.७३ टक्के रक्कम ही व्याज आहे. याच हिशोबाने आई-वडील दोघांनीही मुलीसाठी गुंतवणूक केल्यास २१व्या वर्षी मुलीसाठी १.२७ कोटी रुपये इतकी रक्कम तुमच्या हाती मिळू शकते.