ज्येष्ठ नागरिकांना निवृत्ती वेतन देणाऱ्या प्रधानमंत्री वय वंदना योजनेला (पीएमव्हीव्हीवाय) केंद्र सरकारने तीन वर्षांची मुदतवाढ दिली आहे. या योजनेचा कालावधी आता 31 मार्च 2023 पर्यंत वाढविण्यात आला आहे. याआधी ही योजना 31 मार्च 2020 पर्यंतच सुरु होती.
काय आहे योजना?
ज्येष्ठ नागरिक म्हणजेच 60 वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांसाठी केंद्र सरकारची ही पेंशन योजना असून योजनेचा लाभ एकत्र रक्कम भरल्यानंतर घेतला जाऊ शकतो. भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) माध्यमातून योजनेची अमलबजावणी केली जाते. शिवाय प्रमुख बँकांमध्ये ही योजना उपलब्ध आहे.
सुरुवातीच्या टप्प्यात या योजनेवर निश्चित व्याजदराचा परतावा मिळत मात्र आता व्याजदर फ्लोटिंग स्वरूपाचे असेल.
आर्थिक वर्ष 2020-21 साठी 7.4 टक्के व्याज मिळणार आहे. 10 वर्षांनंतर गुंतलेल्या रकमेची परतफेडही अशी ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी निश्चितच एक आकर्षक गुंतवणूक पर्याय आहे. विशेषत: बँकांच्या ठेवींवरील व्याजदर घसरत असताना, नियमित व निश्चित स्वरूपाचे उत्पन्न देणारा हा पर्याय ज्येष्ठांना खूपच उपयुक्त ठरेल.
या योजनेत गुंतवणुकीची कमाल आणि किमान मर्यादा ठरविण्यात आली आहे. ही किमान/कमाल मर्यादेची रक्कम लाभार्थ्यांकडून पेन्शनप्राप्तीसाठी निवडण्यात आलेल्या कालावधीनुरूप वेगवेगळी निश्चित करण्यात आली आहे. जर वार्षिक पेन्शन घ्यायची असल्यास किमान 1,56,658 रुपये या योजनेत गुंतविले जाऊ शकतील. त्या उलट मासिक पेन्शन हवी असणाऱ्यांना किमान 1,62,162 रुपये गुंतविता येणार आहेत. तर कमाल गुंतवणुकीची मर्यादा 15 लाख रुपये आहे.
किती गुंतवणूक करता येते?
योजनेत जास्तीत जास्त 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येऊ शकते. 15 लाखांवर दर महिन्याला 10 हजार रुपये पेंशन मिळू शकते. प्राप्तिकर अधिनियम 1961 च्या कलम 80-सीअंतर्गत ही रक्कम पूर्णपणे करमुक्त आहे. महत्त्वाचे म्हणजे पती-पत्नी मिळून एकूण 30 लाख रुपये गुंतवणूक करू शकतात.
पेंशन कधी मिळणार?
पॉलिसीचा कालावधी 10 वर्ष असून पेंशन दर महिन्याला, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक घेण्याचा पर्याय आहे.
योजनेवर कर्जाची सुविधा उपलब्ध
तीन वर्षानंतर गुंतविलेल्या रकमेच्या 75 टक्के रक्कम कर्ज स्वरूपात मिळविता येऊ शकते. पेंशन रकमेतून कर्जावरील व्याज कापून घेतले जाते.
पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास
योजनेत गुंतवणूक केल्यानंतर 10 वर्षांच्या आत पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास गुंतविलेले पूर्ण रक्कम नॉमिनीला मिळणार आहे.