भारत बाँड ईटीएफच्या दुसऱ्या टप्प्यातील दोन मालिका येत्या जुलै महिन्यात सादर करण्यात येणार असल्याचे एडलविस अॅसेट मॅनेजमेंटतर्फे शुक्रवारी जाहीर करण्यात आले. या माध्यमातून १४,००० कोटी रुपये खुल्या बाजारातून मिळविण्याची योजना आहे. या दोन मालिकांची मुदत एप्रिल २०२५ आणि एप्रिल २०३१मध्ये संपणार आहे.

या मालिकेच्या माध्यमातून बाजारातून येणाऱ्या मागणीच्या आधारावर ११,००० कोटी रुपये अतिरिक्त जमा करण्याचे उद्दिष्ट निर्धारित आहे. या माध्यमातून गोळा करण्यात येणारी रक्कम ३००० कोटी रुपये असणार आहे. मात्र, गुंतवणूकदारांकडून अधिक मागणी आल्यास एकूण रक्कम १४,००० कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता आहे.

फंड्स ऑफ फंडही येणार

एडलविस म्युच्युअल फंडाच्या सीईओ राधिका गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार या गुंतवणुकीमध्ये गुंतवणूकदारांना विविधा वेळी आपल्या गुंतवणुकीच्या गरजेनुसार विविध पर्याय उपलब्ध होणार आहेत. अशाप्रकारच्या मॅच्युरिटीजसह ज्या गुंतवणूकदारांकडे डीमॅट अकाउंट नाही, त्यांच्यासाठी भारत बाँड फंड्स ऑफ फंड्सही सादर करणार आहे.

नाबार्ड, एनटीपीसीचा समावेश

बाँड ईटीएफ निफ्टी भारत बाँड निर्देशांकामध्ये गुंतवणूक करतो. त्यामध्ये एक्झिम बँक, एचपीसीएल, हुडको, आयआरएफसी, नाबार्ड, एनएचएआय, एनएचपीसी, एनटीपीसी, पीएफसी, एनपीसीआयएल, पॉवर ग्रीड, आरईसी आणि सिडबीसह ट्रिपल ए रेटिंग असणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश आहे.

अभिप्राय द्या!