मुंबई शेअर बाजाराने आपल्या म्युच्युअल फंड वितरण मंचावर म्युच्युअल फंडांत सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अंतर्गत (एसआयपी) केली जाणारी गुंतवणूक मध्येच काही काळासाठी थांबवण्यास आणि नंतर पुन्हा सुरू करण्यास अनुमती दिली आहे. यापूर्वी ही ‘पॉझ’ सुविधा फक्त नऊ फंड हाउसच्या निवडक योजनांसाठी होती.
करोना संसर्गामुळे अनेकांच्या उत्पन्नावर विपरित परिणाम झाला आहे. अनेकांचे रोजगार गेले आहेत, काही जणांचे वेतन कमी केले गेले आहे. अनेक व्यावसायिकांचे व्यवसाय लॉकडाउनमुळे बंद आहेत. सोमवारपासून लॉकडाउन संपले असले, तरी आर्थिक आवक सुरू होण्यास काही काळ जावा लागणार आहे. यामुळे गुंतवणूकदारांपुढे गुंतवणूक नियमित सुरू कशी ठेवायची हा यक्षप्रश्न आहे. या गुंतवणूकदारांना दिलासा देण्यासाठी ही पॉझ सुविधा खूप उपयुक्त ठरणार आहे.