मिराई अॅसेट इनव्हेस्टमेंट मॅनेजर्स इंडियाने गुंतवणूकदारांसाठी मिराई अॅसेट आर्बिट्राज हा नवीन फंड बाजारात आणला आहे. मुदतमुक्त श्रेणीतील हा फंड व्याजदरातील तफावत म्हणजेच आर्बिट्राज संधी हेरत गुंतवणूकीआधारे परतावा मिळवून देणार आहे. हा फंड 3 जूनपासून गुंतवणूकदारांसाठी खुला होत असून 12 जूनला बंद होणार आहे. फेरगुंतवणूक आणि विक्रीसाठी हा फंड पुन्हा 22 जुनपासून सुरु होणार आहे. हा फंड निफ्टी फिफ्टी आर्बिट्राज इंडेक्सनुसार गुंतवणूक करणार आहे.
 
फंडासाठी किमान गुंतवणूक पाच हजार रुपये असून त्यानंतर एक रुपयाच्या पटीत कितीही गुंतवणूक करता येईल. फंडाचे युनिट हे पुर्ण संख्येत दिले जाणार असून शिल्लक रक्कम गुंतवणूकदारांना पुन्हा दिली जाणार आहे. या फंडात नियमित आणि थेट योजना असे दोन प्रकार असून त्यातही वृध्दी आणि लाभांश ( निधी वाटप आणि फेरगुंतवणूक ) हा पर्याय उपलब्ध राहणार आहे.
 
नवीन फंडाची काही प्रमुख वैशिष्टे म्हणजे नुकसान टाळण्यासाठी हेजिंग तत्वाचा अवलंब करणार आहे. दीर्घ मुदतीसाठी चलनसाधनांत तर अल्प मुदतीसाठी फ्युचर्समध्ये गुंतवणूक करत हेजिंगआधारे सुरक्षितता प्रदान करणार आहे. याशिवाय अल्प प्रमाणात काही निधी कंपन्यांच्या रोख्यांमध्ये गुंतवत अन्य आर्बिट्राज संधीचाही लाभ उठविणार आहे. शेअरबाजार विशिष्ट दिशेनेच मार्गक्रमण करेल, अशी भुमिका टाळत जोखीममुक्त परतावा मिळविण्यावर या फंडाचा भर राहणार आहे. आर्बिट्राजच्या संधी मर्यादीत असल्यास या योजनेतील काही निधी अल्प मुदतीसाठी उच्च दर्जाच्या कंपनी रोख्यांमध्ये अथवा चलन बाजाराच्या विविध साधनांमध्ये गुंतविला जाणार आहे. डेरिव्हेटीजमधील गुंतवणूकीसाठी आवश्यक असलेले मनी मार्जिन हे मुदत ठेवी, रोख निधी अथवा त्यासमान साधनांद्वारे सांभाळले जाईल.
 
फंडाचे व्यवस्थापन हे जिग्नेश एन. राव आणि जिगर सेठिया ( समभाग ) आणि महेंद्र जाजू ( रोखे) हे तिघे सांभाळणार आहेत.

अभिप्राय द्या!