रोकडसुलभता म्हणजे आपल्या गुंतवणूक जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा आपल्या गुंतवणूक विकून गुंतवणुकीचे रोकड (चलनात) रूपांतर करण्यास किती किंमत मोजावी लागेल आणि त्यासाठी किती वेळ लागेल यावर त्या मालमत्तांची रोकडसुलभता ठरते. अशा रूपांतरणाची प्रक्रिया मालमत्तेपेक्षा भिन्न असते. उदाहरण म्हणून माझी तीन वर्षांची मुदत ठेव मला १२ व्या महिन्यांत रोकडसुलभ करायची असेल तर मला मिळणाऱ्या व्याजापेक्षा कमी व्याज १२ महिन्यांसाठी मिळेल. ही झाली माझी मालमत्ता रोकडसुलभ करण्यास द्यावी लागणारी किंमत. आणि बँकेत रक्कम माझ्या खात्यात जमा होण्यास अर्धा तास लागेल. पण हीच रक्कम भविष्यनिर्वाह निधीतून काढायची असेल तर प्रक्रिया वेळखाऊ , कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर महिन्यानंतर पैसे खात्यात जमा होतील. पण या ठिकाणी पैसे काढून घेतल्याबद्दल नुकसान होणार नाही.
दुसरीकडे, लिक्विड फंड किंवा मनी मार्केट फंड हा फंड प्रकार अतिशय रोकडसुलभ असतो. या फंडातून बाजार मूल्याच्या ९५ टक्के किंवा कमाल ५० हजार २४ तासांत काढता येतात. आणि हे पैसे ३० मिनिटांत गुंतवणूकदाराच्या खात्यात जमा होतात. लिक्विड फंडांना ३० दिवसांपेक्षा कमी मुदत असलेल्या रोख्यांत पैसे गुंतवण्याची मुभा असल्याने व्याजदर वाढीमुळे रोख्यांच्या किमतीत घसरण होत नाही. या फंडातून रक्कम काढल्यानंतर त्वरित आणि ‘टी + १’ (म्हणजे कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी) पैसे खात्यात जमा होतात. पोर्टफोलिओचा काही भाग फंडांच्या खात्यात रोख रकमेच्या रूपात ठेवणे सक्तीचे असल्याने या रोख रकमेतून पैसे गुंतवणूकदाराच्या खात्यात जमा होते.
प्रत्येक फंड घराण्याला किमान एक फंड ‘इन्स्टंट रिडम्प्शन; या प्रकारे कार्यरत असण्याची ‘सेबी’ने सक्ती केल्याने प्रत्येक फंड घराण्याकडे या प्रकारचा एक फंड असतो.
डीएसपी फंड घराण्याचा डीएसपी लिक्विडिटी फंड हा त्वरित पैसे काढून घेण्याची सोय असलेला फंड आहे.
गुंतवणुकीत मुख्यत्वे बँकांच्या ‘सीडी’ कंपन्यांच्या ‘सीपी’ आणि केंद्र सरकारच्या ट्रेझरी बिल्सचा समावेश आहे. केदार कर्णिक आणि राहुल वेकारिया हे या फंडाचे अनुक्रमे निधी व्यवस्थापक आणि सह-निधी व्यवस्थापक आहेत. क्रिसिल लिक्विड फंड इंडेक्स हा या फंडाचा मानदंड आहे.
महिन्याच्या शेवटी शिल्लक रक्कम कायम लिक्विड फंडात गुंतवणूक करावी. लिक्विड फंड उच्च रेटिंग असलेल्या रोख्यांत गुंतवणूक करीत असल्याने गुंतवणुकीत अगदी कमी जोखीम असते. सात दिवसांनंतर पैसे काढल्यास कोणताही अतिरिक्त भार लागत नाही. गुंतवणूकदार किमान ५०० रुपयांची या फंडात गुंतवणूक करू शकतात. ‘रिअल टाइम रीडम्पशन’ असल्याने ३० मिनिटांत पैसे खात्यात जमा होतात.रोकड सुलभता जपण्यासाठी या फंडाचा विचार करावा.