करोना संसर्गामुळे भयभीत झालेल्या नागरिकांना भारतीय टपाल खात्याने (पोस्टाने) मोठाच दिलासा दिला आहे. नव्या तिमाहीमध्ये सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधीसह (पीपीएफ) सर्व अल्पबचत योजनांचे व्याजदर कमी होतील, अशी अटकळ व्यक्त होत असतानाच पोस्टाने हे व्याजदर पूर्वीप्रमाणेच ठेवले आहेत.

चालू आर्थिक वर्षाच्या (२०२०-२१) दुसऱ्या तिमाहीसाठी (१ जुलै ते ३० सप्टेंबर) पीपीएफवर पूर्वीप्रमाणेच ७.१० टक्के व्याज मिळेल. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर ७.४० टक्के व्याज मिळेल, तर पोस्टाच्या विविध मुदतींच्या मुदतठेवींवर ५.५ ते ६.७ टक्के व्याज मिळेल.

आजच्या घडीला पोस्ट बँकेतील बचत खात्यावर अन्य बँकांपेक्षा सर्वाधिक, ४ टक्के व्याज मिळत आहे. भारतीय स्टेट बँकेने ३१ मे पासून बचत खात्यावर २.७ टक्के व्याज देण्यास सुरुवात केली आहे. आयसीआयसीआय बँकेतर्फे तिच्या बचत खात्यात ५० लाख रुपयांपेक्षा कमी रक्कम असेल तर त्यावर ३ टक्के व्याज दिले जात आहे. बँक बचत खात्यावर ६ टक्के व्याज देऊ करणाऱ्या कोटक महिंद्र बँकेने एक लाख रुपयांपर्यंत शिल्लक रक्कम असलेल्या बचत खात्यांवर ३.५ टक्के व्याज देण्यास सुरुवात केली आहे. एक लाख रुपयांवरील रकमेसाठी ही बँक ४ टक्के व्याज देत आहे. मात्र पोस्ट ऑफिस बचत खात्यावर ४ टक्के व्याज मिळत आहे.

अभिप्राय द्या!