करोना व्हायरस रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाउनचा फटका केंद्र सरकारच्या अल्प बचत योजनांना बसला आहे. नागरिकांची लॉकडाउनमध्ये झालेली गैरसोय दूर करण्यासाठी सरकारने सुकन्या समृद्धी योजनेत (goverment relax age norms for Sukanya Samriddhi Yojana) महत्वाचा बदल केला आहे. त्यानुसार ‘लॉकडाउन’मध्ये २५ मार्च २०२० ते ३० जून २०२० या काळात वयाची १० वर्षे पूर्ण केलेल्या मुलींची ३१ जुलै २०२० पर्यंत सुकन्या समृद्धी योजनेत नवी खाते सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

प्रत्येक पालकांना आपल्या मुलांच्या भविष्याची काळजी असते. त्यामुळेच त्यांचे शिक्षण उत्तम व्हावे आणि चांगल्या पद्धतीने त्याची वाढ व्हावी यासाठी सर्व जण प्रयत्न करत असतात. पालकांना मुलांच्या शिक्षणासोबत त्यांच्या लग्नाची देखील काळजी असते. लग्न म्हटले की मोठा खर्च येतो. अशा गोष्टीचा विचार करून सरकारने सुकन्या समृद्धी योजना सुरु केली आहे. या योजनेत नियमित गुंतवणूक केल्यास मुलगी वयाच्या २१व्या वर्षी करोडपती बनू शकते. सुकन्या समृद्धी योजना ही सरकारची स्मॉल डिपॉझिट स्कीम आहे. मुलींसाठी ही योजना सर्वात लोकप्रिय असून सरकारने ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ या अंतर्गत ही योजना सुरू केली होती.

 

 • या योजनेत व्याजदर किती आहे ?
  – केंद्र सरकारच्या इतर अल्पबचत गुंतवणुकीच्या व्याजदरांप्रमाणे सुकन्या समृद्धी योजनेचा दर तीन महिन्यांनी व्याजदर जाहीर केला जातो. सध्या या योजनेवर ७.६ टक्के व्याज आहे.
 • गुंतवणूक कर वजावटीस पात्र आहे का ?
  – होय. सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूकदाराला करलाभ मिळतात. ज्या आर्थिक वर्षात या खात्यात पैसे भरले जातील तेवढे पैसे किंवा १,५०,००० यात कमी असलेली रक्कम त्या आर्थिक वर्षातल्या उत्पन्नातून आयकर ‘कलम ८० सी’अंतर्गत कर वजावटीस पात्र आहे.
 • या योजनेचे खाते कुठे सुरु करता येईल?
  – सुकन्या समृद्धी योजनेत नवीन खातं सुरु करण्याची सुविधा टपाल कार्यालयात तसेच सार्वजनिक आणि खासगी बँकांमध्ये उपलब्ध आहे. मात्र, मुलीच्या दहाव्या वर्षांपर्यंतच फक्त दोन मुलींसाठीच या योजनेत खाते उघडता येतं.
 • किती गुंतवणूक करू शकतो ?
  सुकन्या समृद्धी योजने योजनेत किमान २५० रुपये तर कमाल १.५ लाख इतकी रक्कम प्रत्येक महिन्याला जमा करू शकता. गुंतवणुकीला आयकरातून सूट आहे. त्याशिवाय व्याज काढून घेतल्यास आणि अंतिम रक्कम जेव्हा हातात येते त्यावर कोणताही कर आकारला जात नाही.
 • गुंतवणुकीचा कालावधी किती ?
  -या योजनेनुसार पालक आपल्या मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नाच्या खर्चासाठी पैसे जमा करू शकतात. मुलगी २१ वर्षाची होईपर्यंत परतावा म्हणून मोठी रक्कम मिळू शकते. सध्याच्या नियमानुसार जर मुलगी लहान असताना यात गुंतवणूक करण्यास सुरूवात केल्यास तर १५ वर्ष गुंतवणूक करता येते.

 

अभिप्राय द्या!