मुदत ठेवींच्या तुलनेत सरस परतावा देणारी एक योजना सध्या सुरु आहे. भारत बाँड एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) खुला झाला असून त्यातून १४००० कोटींचा निधी उभारला जाणार आहे. ही योजना १७ जुलै पर्यंत खुली आहे. यापूर्वी आलेल्या भारत बाँड ईटीएफ ना वैयक्तिक गुंतवणूकदारांकडून चांगली पसंती मिळत आहे. गेल्या वर्षी आलेल्या या योजनेत १२४०० कोटींचा निधी सरकारने उभारला होता. यंदाही ११ वर्षांपर्यंत या योजनेत गुंतवणूक करता येईल.

भारत बाँड ईटीएफमध्ये किमान १००० रुपयांची गुंतवणूक करता येईल.या योजनेत वैयक्तिक गुंतवणूकदार जास्तीत जास्त २ लाखांची गुंतवणूक करू शकतो.शुक्रवार १७ जुलैपर्यंत ही योजना गुंतवणुकीसाठी खुली आहे.

केंद्र सरकारच्या भारत ईटीएफमधून यावेळी १४००० कोटींचा निधी उभारला जाण्याची शक्यता आहे. या योजनेत दोन गुंतवणूक मालिका आहेत. एकाची मुदत एप्रिल २०२५ आणि दुसऱ्या मालिकेची मुदत एप्रिल २०३१ पर्यंत आहे. यामुळे या फंडाची तुलना फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन , बँकिंग आणि पीएसयू फंडाशी केली जाते. डेट फंडांच्या तुलनेत बॉंड ईटीएफची किंमत खूपच कमी आहे. गुंतवणूकदारांसाठी हा एक चांगला पर्याय आहे.

भारत बाँड ईटीएफमधील गुंतवणूक निधी हा आर्थिकदृष्ट्या सक्षम कंपन्यांमध्ये गुंतवला जाणार आहे. या कंपन्या भारत निर्माणामध्ये योगदान देतील, असा सरकारला विश्वास आहे. ५ वर्षासाठी जर बॉंडमध्ये गुंतवणूक केली तर सरासरी ५.६९ टक्के परतावा मिळतो. जर हीच गुंतवणूक ११ वर्षांसाठी केली तरी रिटर्न ६.९ टक्के मिळतो. आजच्या घडीला मुदत ठेवी (FD) आणि रिकरिंग डिपॉझीटच्या (RD) तुलनेत या योजनेतून सरस परतावा मिळेल.

अभिप्राय द्या!