आपल्या स्वप्नातील घर साकारण्यासाठी आपण अविरत कष्ट करतो. ते सुरक्षित राखण्यासाठी संरक्षक दरवाजा, कॅमेरे व उत्तम दर्जाचे कुलूप अशी सुरक्षा साधने वापरतो. सर्वसाधारणपणे आपल्या आयुष्यातला प्रदीर्घ काळ घरासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडण्यातच घालवतो. मात्र, गृहविम्यासारखे अतिशय महत्त्वाचे सुरक्षा साधन आपण विसरतो. भारतात एकूणच विमा उतरवण्याचे प्रमाण अतिशय अत्यल्प म्हणजेच एक टक्क्याहूनही कमी आहे. त्यामुळे गृहविमा उतरवण्याचे प्रमाण त्याहूनही कमी आहे.

घराचा मालक अथवा त्याचा वापर करत असणारी कोणतीही व्यक्ती गृहविमा उतरवू शकते. भाड्याच्या घरात राहणाऱ्या व्यक्तीदेखील गृहविमा घेऊ शकतात. घराची मालकी एखाद्या संस्थेकडे असल्यास अशी संस्थादेखील विमा उतरवू शकते. गृहविम्यामध्ये आग व त्या संबंधित घटना, दरोडा, चोरी, दहशतवादी हल्ला आदी बाबींसाठी सुरक्षा कवच मिळू शकते. इमारतीचे बांधकाम, आतील साहित्य, दागदागिने, किमती वस्तू, कलात्मक आणि सजावटीच्या वस्तूंचाही यात समावेश असतो. घरातील चीजवस्तू महागड्या असल्याने भाड्याने राहात असलेल्या व्यक्तीदेखील त्यांच्या महत्त्वाच्या चीजवस्तूंचा विमा उतरवून आपले आर्थिक नुकसान टाळू शकतात. त्याचबरोबर तुम्ही भाड्याने दिलेल्या घराचे एखाद्या दुर्घटनेत नुकसान झाल्यास, तुमच्या भाडेकरूने घर सोडल्यास न मिळणाऱ्या भाड्याची भरपाई देणारे भाडेकवचही आपण निवडू शकता. काही गृहविमा योजना ग्राहकांना अगदी एका दिवसापासून ते पाच वर्षांसारख्या दीर्घकाळासाठीही खरेदी करता येतात. आपले कर्मचारी, भागीदार अथवा संबंधित व्यक्तींना राहण्यासाठी देऊ केलेल्या जागेचा विमाही संबंधित कंपन्यांना उतरवता येतो.

कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत होऊ शकणारे सर्वांत मोठे नुकसान म्हणजे स्वतःच्या घराचे नुकसान. अशा संकटाच्या वेळी होणारे आर्थिक नुकसान आणि विमा कवच असलेले नुकसान यात प्रचंड फरक दिसून येतो. त्यामुळे गृहविमा योजना खरेदी करून तुम्ही केवळ घराच्या बांधकामाचे नव्हे, तर घरातील चीजवस्तूही संरक्षित करू शकता. तुमचे दागदागिने घरात असोत अथवा बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले असोत, ते गृहविम्याअंतर्गत स्वतंत्रपणे समाविष्ट करता येतात. इतकेच नव्हे, तर तुम्ही घरात असताना घातलेले दागिने असोत किंवा जगभरात कुठेही फिरताना घातलेले दागिने असोत, त्यांचाही विमा तुम्हाला या योजनेंतर्गत उतरवता येतो. कोणतीही व्यक्ती घरातील उपकरणे, फर्निचर, कपडे, मोबाइल, लॅपटॉप, टीव्ही यासारख्या चीजवस्तूंचा विमा उतरवू शकतो.

गृहविमाधारकाच्या घरी चोरी झाल्यास योजनेंतर्गत चोरीला गेलेल्या किंवा नुकसान झालेल्या गोष्टींचीही नुकसानभरपाई मिळू शकते.

विमा योजना महाग असतात, असा एक सर्वसाधारण गैरसमज आहे. या योजनांचा हप्ता अगदी दिवसाला पाच रुपयांपासून सुरू होतो. मात्र, अनेकांना त्यांचे नुकसान झाल्यानंतरच त्यांची किंमत कळते. अत्यंत कष्टाने उभारलेले आणि जीवापाड जपलेले घर हे प्रत्येकासाठीच अत्यंत महत्त्वाची व कायमस्वरूपी मालमत्ता असते. त्यामुळे त्यासाठी पुरेसे सुरक्षा कवच नसेल, तर मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे कर्जाचे हप्ते भरतानाच घरासाठी व घरातील मालमत्तेसाठी गृहविमा उतरवणे तितकेच महत्त्वाचे आहे.

आणि यासंबंधी  अधिक माहितीसाठी आपण धनलाभाच्या कार्यालयाला भेट देऊ शकता !!

अभिप्राय द्या!