आजूबाजूच्या परिस्थितीचा आढावा घेता असं लक्षात येत  की, अर्थव्यवस्था किती खाली जाणार आहे याबद्दल सगळेच साशंक आहेत, टाळेबंदी कधी संपणार हेसुद्धा कळत नाही, करोनाचे आकडे अजून किती दिवस असे वाढणार आणि त्याचा प्रादुर्भाव कसा कमी होणार, ही मोठी चिंता बऱ्याच देशांना सतावत आहे, उद्योगधंदे अजूनही पूर्णपणे सुरू नाही होऊ शकले आहेत! आणि या सर्वापेक्षा सामान्य व्यक्तीला भेडसावणारा प्रश्न आहे तो पैशांचा! अगदी नोकरी नसणाऱ्यांपासून ते चांगली गुंतवणूक असणाऱ्यालासुद्धा. ज्येष्ठांचा वर्ग जो मुदत ठेवी, प्रधानमंत्री वय वंदना योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये सगळेच पैसे ठेवत होते ते चिंतेत आहेत की, यापुढे अजून किती कमी व्याजदर पाहावे लागणार आहेत. जी मंडळी ‘म्युच्युअल फंड सही है’ म्हणून ‘एसआयपी’ करत आहेत, तीसुद्धा बुचकळ्यात पडली आहेत की नक्की किती वर्षांनी परतावे मिळणार! पारंपरिक गुंतवणूक पर्याय म्हणून सोन्याकडे बघणारी मंडळी आजचा भाव बघून खूश आहेत, पण अजून पैसे घालायचे का याचं ठोस उत्तर काही केल्या मिळत नाही. स्थावर मालमत्तेचे चांगले दिवस अजून किती लांब आहेत, भाडय़ाने दिलेल्या जागांमधून नियमित मिळकत चालू राहील का, गरजेसाठी जर एखादी प्रॉपर्टी घ्यायची असेल तर ही योग्य वेळ आहे का, असे संभ्रमसुद्धा लोकांना भंडावून सोडत आहेत. – मग गुंतवणूक करायची तरी कुठे?

येत्या वर्षभरातील गरजांना व्यवस्थितपणे पुरतील इतके पैसे पूर्णत: सुरक्षित ठिकाणी ठेवावे. बचत खाते, चांगल्या बँकेत मुदत ठेव, अतिशय सुरक्षित असणाऱ्या कंपन्यांचे डिपॉझिट, कमी मुदतीचे आणि चांगला पोर्टफोलिओ असणारे डेट म्युच्युअल फंड – हे गुंतवणूक पर्याय वापरावेत. सगळे पैसे एकीकडे न ठेवता तीन-चार ठिकाणी विभागून ठेवावेत.

पुढे पाच वर्षांत लागणाऱ्या पैशांना गुंतवताना काळजीपूर्वक राहणं गरजेचं आहे. कारण आज जरी व्याज दर खाली असले तरीही येत्या काळात कधी हे चक्र पालटेल ते सांगता येत नाही. अजून खाली जातील या भीतीने सर्व पैसे दीर्घ काळासाठी ठेवले आणि मध्येच महागाई वाढल्यामुळे व्याज दर वाढले तर मग परतावे कमी पडतील आणि गुंतवणुकीचं मूल्य कमी होईल. तेव्हा ‘लॅडरिंग’ पद्धत वापरून प्रत्येक वर्षी मुदतपूर्ती होणाऱ्या गुंतवणुकीच्या पर्यायात रक्कम विभागून ठेवावी.

शेअर्स किंवा इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करताना जरा जपूनच. कारण सगळेच उद्योग पुन्हा पूर्ववत होणार नाहीत आणि काही जरी झाले तरी ते तेवढेच फायदेशीर असतील असंही नाहीये! आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे बाजार खाली जाणार आणि किती खाली जाणार हेसुद्धा नक्की सांगता येत नाहीये. म्हणून चांगल्या उद्योगांचे शेअर्स आणि रास्त जोखीम असणारे म्युच्युअल फंड निवडावेत आणि टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करावी. शिवाय जमेल तसा फायदा काढून घ्यावा. कर वाचतो म्हणून दीर्घकाळासाठी गुंतवणूक ठेवली तर मोठा तोटा होऊ शकेल हे ध्यानात ठेवावं.

सोन्याच्या बाबतीत सांगायचं तर भाव भरपूर वर गेलाय हे निश्चित आहे; परंतु यापुढे अजून वर जाणार नाही असं अजिबात नाहीये. जागतिक अस्थिरता अजून कमी झालेली नाही आणि आपल्या देशाच्या चलनाची म्हणजेच रुपयाची किंमतसुद्धा स्थिरावली नसल्याने आपल्याकडे सोने महाग झालेले आहे. तेव्हा या गुंतवणूक पर्यायाकडे कानाडोळा करून चालणार नाही; परंतु जसा पैसा शेअर बाजाराकडे वळला आहे तसाच तो सोन्याकडेही गेला आहे. तेव्हा सोन्याचे भाव कधी आणि किती खाली येतील हे सांगणं कठीण आहे. तरीसुद्धा, मला असं वाटतं की, थोडे पैसे सोन्यामध्ये घालायला हरकत नाही; पण असं करताना दागिने न घेता, सोन्याचे ईटीएफ किंवा गोल्ड म्युच्युअल फंड (गुंतवणूक करण्यापूर्वी एग्झिट लोड लक्षात घ्या!) हे उपयुक्त पर्याय आहेत. सॉव्हरिन गोल्ड बॉण्डवर गुंतवणूक करताना थोडी थोडी रक्कम गुंतवावी आणि सोन्याच्या किमतीवर व्यवस्थित लक्ष ठेवावं.

आणि या सर्व विस्तृत माहितीसाठी तज्ञ सल्लागाराचा सल्ला घ्यावाच !!

अभिप्राय द्या!