क्रिसिल म्युच्युअल फंड पत क्रमवारीत समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंड गटात अ‍ॅक्सिस आणि कॅनरा रोबेको फंड घराण्याने बाजी मारली आहे. तर रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडात एडलवाईस फंड घराणे अव्वल ठरले आहे.

क्रिसिल प्रत्येक तिमाहीतील फंडांच्या त्या फंड गटातील तुलानात्मक कामगिरीनुसार फंडाची क्रमवारीत विभागणी करीत असते. एप्रिल-जून २०२० या कालावधीतील कामगिरीनुसार क्रिसिल क्रमवारी नुकतीच प्रसिद्ध झाली. ‘सीएमएफआर’ म्हणजेच क्रिसिल म्युच्युअल फंड रँकिंगमध्ये समावेशासाठी मूलभूत निकष निश्चित आहेत. किमान तीन वर्षेपूर्ण केलेल्या आणि गुंतवणुकीसाठी कायम खुल्या असलेल्या (ओपन एंडेड) फंडांचा या क्रमवारीसाठी विचार केला जातो. याव्यतिरिक्त किमान मालमत्ता हादेखील एक निकष आहे.

समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडाची विभागणी १० फंड गटात, हायब्रीड फंडांची विभागणी तीन फंड गटात तर रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडांची विभागणी १२ फंड गटात करण्यात येते. लार्ज कॅप गटात अ‍ॅक्सिस ब्लू चिप आणि कॅनरा रोबेको ब्लू चिप अव्वल ठरले आहेत. मल्टी कॅप गटात कॅनरा रोबेको इक्विटी डायव्हर्सिफाइड आणि पीजीआयएम इंडिया डायव्हर्सिफाइड आणि यूटीआय इक्विटी या फंडांना क्रिसिलने अव्वल मानांकन दिले आहे.

अभिप्राय द्या!