रक्षितता, करमुक्त व्याज व प्राप्तिकर कलम 80 सीअंतर्गत मिळणारी वजावट या तीन कारणांमुळे सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ) हा एक लोकप्रिय गुंतवणूक पर्याय झाला आहे. असे असले तरी यातील गुंतवणूक दीर्घकालीन असून, (किमान 15 वर्षे) या मुदतीत खाते बंद करता येत नाही; मात्र गरज पडल्यास सुरवातीच्या 3 ते 6 वर्षांत आधीच्या दोन वर्षांच्या शिल्लक रकमेच्या 25 टक्केइतकी रक्कम कर्ज म्हणून घेता येते व सातव्या वर्षापासून आधीच्या वर्षीच्या शिल्लक रकमेच्या 50 टक्के किंवा त्याआधीच्या चौथ्या वर्षीच्या शिल्लक रकमेच्या 50 टक्के या दोहोंतील जी कमी रक्कम असेल, तेवढी रक्कम काढता येते. यामुळे गुंतवणुकीची तरलता (लिक्विडीटी) मोठ्या प्रमाणावर कमी होत होती. ही उणीव दूर करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने काही विशिष्ट परिस्थितीत “पीपीएफ’चे खाते मुदतपूर्व बंद करण्याची सवलत देऊ केली आहे. याची बऱ्याच जणांना अजूनही माहिती नाही. म्हणून याबाबत माहिती घेऊया.

1) पीपीएफ खातेधारकाचा खात्याची मुदत संपण्याच्या आधी मृत्यू झाल्यास नॉमिनी अथवा कायदेशीर वारस हे खाते मुदतपूर्व बंद करू शकतो व यास काहीही दंड किंवा पेनल्टी लावली जात नाही, 2) पीपीएफ खातेदार स्वत:, त्याची पत्नी किंवा पती किंवा खातेधारकावर अवलंबून असलेली मुले अथवा आई-वडील यापैकी कोणीही गंभीर आजाराने ग्रस्त असेल, तर वैद्यकीय उपचाराच्या खर्चासाठी “पीपीएफ’चे खाते मुदतपूर्व बंद करता येते; मात्र यासाठी सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सोबत जोडणे आवश्‍यक असते, 3) “पीपीएफ’चे खाते उच्च शिक्षणाच्या खर्चासाठी (खातेदाराच्या स्वत:च्या अथवा मुलांच्या) मुदतपूर्व बंद करता येते; मात्र यासाठी उच्च शिक्षणाच्या खर्चाचा तपशील (बिलांसह), तसेच संबंधित विद्यापीठाचा (देशी अथवा परदेशी) प्रवेशाचा दाखला सोबत जोडणे आवश्‍यक असते. अशा प्रकारे खाते बंद करण्यासाठी असे खाते किमान पाच वर्षे सलग नियमित असणे आवश्‍यक आहे. थोडक्‍यात, पाच वर्षांच्या आतील खाते मुदतपूर्व बंद करता येत नाही.

आजारपणामुळे किंवा उच्चशिक्षणाच्या निमित्ताने खाते मुदतपूर्व बंद करताना मिळालेल्या व्याजावर 1 टक्काइतकी पेनल्टी लागते, हे लक्षात घेणे आवश्‍यक आहे. उदा. जर “पीपीएफ’चे खाते 1-4-2007 रोजी रु. 10 हजार भरून उघडले असे गृहीत धरले व दरवर्षी 1 एप्रिलला रु. 10 हजार या खात्यात जमा केले तर आणि मिळणारे व्याजदर 8 टक्के गृहीत धरल्यास 31-3-2017 रोजी या खात्यावर रु. 1,56,454.87 एवढी रक्कम जमा असेल व जर हे खाते मुदतपूर्व बंद केले, तर खातेधारकास 7 टक्के दराने व्याज दिले जाईल व मिळणारी रक्कम रु. 1,55,006.22 इतकी असेल

थोडक्‍यात, आता वर उल्लेखलेल्या कारणास्तव “पीपीएफ’चे खाते मुदतपूर्व बंद करता येते. असे असले तरी शक्‍यतो हे खाते मुदतपूर्व बंद न करणेच हितावह असते. आत्यंतिक गरज असेल तरच खाते बंद करावे.

अभिप्राय द्या!