म्युच्युअल फंडाच्या योजनेमध्ये, त्या योजनेचे निव्वळ मत्ता मूल्य (नेट अॅसेट व्हॅल्यू अर्थात एनएव्ही) पाहून आपण पैसे गुंतवतो. परंतु आता एखाद्या योजनेमध्ये पैसे गुंतवण्यासाठी धनादेश संबंधित म्युच्युअल फंड प्रतिनिधीला दिल्यानंतर ताबडतोब तुम्हाला NAV कळणार नाही किंवा त्या एनएव्हीप्रमाणे गुंतवणूक केली जाणार नाही.
त्याऐवजी तो धनादेश किंवा ऑनलाइन पेमेंट केले असल्यास ती रक्कम संबंधित फंडाकडे जमा झाल्यावर, जमा झालेल्या दिवसाची एनएव्ही गुंतवणुकीसाठी लागू होईल. भांडवल बाजार नियंत्रक सेबीने हा नवा आदेश काढला आहे.
याआधी दोन लाख रुपयांपेक्षा कमी रकमेच्या गुंतवणुकांसाठी अर्ज केल्यानंतर लगेचच त्या गुंतवणूकदाराला एनएव्ही समजत असे. त्यामुळे नेमके किती युनिट आपल्या नावे जमा होणार ते त्याला अर्ज केल्यानंतर त्याच दिवशी समजत असे. परंतु प्रत्यक्ष रक्कम फंडाकडे जमा होऊन व्यावहार पूर्ण होताना एनएव्हीत फरक झाल्यास निष्कारण वाद निर्माण होत असत. हे आता टाळता येणार आहे.