माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी ‘टीसीएस’च्या पाठोपाठ विप्रोनेही मंगळवारी भागधारकांना खूश करणारी ९,५०० कोटी रुपयांची समभाग पुनर्खरेदीची (बायबॅक) योजना जाहीर केली. या योजनेतून भागधारकांच्या हाती असलेले २३.७५ कोटी समभागांची प्रत्येकी ४०० रुपये किमतीला पुनर्खरदी केली जाणार आहे.
कंपनीच्या मिळकतीतून भागधारकांना निरंतर लाभ मिळवून देण्याच्या तत्त्वाला अनुसरून समभाग पुनर्खरेदीची ही घोषणा असल्याचे विप्रोचे मुख्य वित्तीय अधिकारी जतीन दलाल यांनी मंगळवारच्या संचालक मंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती देताना सांगितले. चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या सहामाहीच्या बिगर लेखापरीक्षित वित्तीय कामगिरीही संचालक मंडळाने विचारात घेतली. या सहामाहीत कंपनीचा नक्त रोकड प्रवाह हा निव्वळ उत्पन्नाच्या १६०.७ टक्के असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विप्रोकडून निर्धारित ४०० रुपये ही पुनर्खरेदी किंमत, मंगळवारच्या भांडवली बाजारातील व्यवहारात विप्रोच्या ३७५.५० रुपये या बंद भावाच्या तुलनेत ६.४ टक्के अधिमूल्य प्रदान करणारी आहे. आठवडाभरापूर्वी टीसीएसने प्रति समभाग ३,००० रुपये किमतीला १६,००० कोटी रुपयांची पुनर्खरेदी योजना जाहीर केली असून, गत चार वर्षांतील त्या कंपनीची ही या प्रकारची तिसरी योजना आहे. तर विप्रोनेही २०१९ सालात १०,५०० कोटी रुपये, २०१७ मध्ये ११,००० कोटी रुपये तर २०१६ मध्ये २,५०० कोटी रुपये खर्चाची समभाग पुनर्खरेदी योजना राबविली आहे.