करोना संकटात कर्जदारांना दिलासा देणाऱ्या केंद्र सरकारच्या व्याजमाफी योजनेच्या अंमलबजावणीचा मार्ग मंगळवारी मोकळा झाला आहे. ही योजना मान्य करत रिझर्व्ह बँकेने आज अध्यादेश जारी केला. ज्यात बँकांना या योजनेच्या अंमलबजावणीचे निर्देश देण्यात आले आहेत. चक्रवाढ व्याज माफीने जवळपास ७५ टक्के कर्जदारांना दिलासा मिळणार आहे. तर यामुळे केंद्राच्या तिजोरीवर ६५०० ते ७००० कोटींचा अतिरिक्त भर येण्याची शक्यता आहे.
कर्जदारांना दिलासा देणारी ही योजना येत्या ५ नोव्हेंबर रोजी लागू होणार आहे. बॅंकांना तसेच वित्त संस्थांना चक्रवाढ व्याजाची माफ केलेली रक्कम ५ नोव्हेंबरपासून कर्जदाराच्या बँक खात्यात जमा करावी लागणार आहे. त्यानंतर या रकमेची बँकांना १२ डिसेंबरपर्यंत सरकारकडे मागणी करता येईल.