आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे राजधानी नवी दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव (प्रति दहा ग्रॅम) ५५,००० रुपयांच्या वर गेला आहे. अशा परिस्थितीत जर सोने खरेदी करण्याचा विचार तुम्ही करीत असाल, तर बाजारभावापेक्षा कमी भावाने सोने खरेदी करण्याची संधी केंद्र सरकारने उपलब्ध करून दिली आहे.

सार्वभौम सोने खरेदी योजनेअंतर्गत येत्या १३ नोव्हेंबरपर्यंत प्रति दहा ग्रॅमसाठी ५१,७७० रुपयांनी सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी चालून आली आहे. हा दर बाजारभावापेक्षा ३,३३० रुपयांनी कमी आहे. चालू आर्थिक वर्षातील ही आठवी मालिका आहे. या योजनेसाठी जे गुंतवणूकदार ऑनलाइन अर्ज करतील आणि डिजिटल पेमेंट करतील त्यांना प्रति ग्रॅम ५० रुपयांची सवलत मिळणार आहे.

राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) आणि मुंबई शेअर बाजार (बीएसई) येथूनही सुवर्णरोख्यांची खरेदी करता येईल. सुवर्णरोख्यांचा कालावधी आठ वर्षांचा असून, कालावधी पूर्ण होण्याआधी या रोख्यांची विक्री करायची झाल्यास ती कालावधीच्या पाचव्या वर्षापासून करता येईल. किमान गुंतवणूक एक ग्रॅम सोन्याच्या युनिटमध्ये, तर कमाल गुंतवणूक चार किलो सोन्याच्या युनिटमध्ये करता येईल. सरकार या रोख्यांवर २.५ टक्के व्याज देणार आहे. हे सुवर्णरोखे शेअर बाजारात सूचिबद्ध असणार आहेत.

अभिप्राय द्या!