केंद्र सरकारने ‘ईसीएलजीएस’ म्हणजेच आपत्कालीन पत हमी योजनेला ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदत वाढ देण्यात आल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केले. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आत्मनिर्भर भारत ३.० च्या तिसऱ्या टप्प्यातील महत्वाच्या घोषणा केल्या. आजची घोषणा उद्योजकांची आर्थिक चिंता मिटवणारी असून पुढील पाच महिने त्यांना बँकाकडून तातडीने पत पुरवठा होणार आहे.
उद्योजकांना पूर्णपणे तारणमुक्त पत हमी मिळावी यासाठी आत्मनिर्भर भारत पॅकेजचा एक भाग म्हणून ‘ईसीएलजीएस’ची (ECLGS) घोषणा करण्यात आली आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, व्यावसायिक उपक्रम, यासाठी वैयक्तिक कर्जरूपाने आणि मुद्रा योजनेतून दि. २९ फेब्रुवारी २०२० रोजी ५० कोटी रूपयांपर्यंत असलेल्या कर्जाच्या २० टक्के मर्यादेपर्यंत पतपुरवठा करण्यात येणार आहे. तसेच ज्या उद्योगांची वार्षिक उलाढाल २५० कोटी आहे, त्यांनाही या योजनाचा लाभ घेता येणार आहे.