नियामक तरतुदींच्या पालनात कसूर केल्याबद्दल राष्ट्रीय शेअर बाजाराने (एनएसई) काव्‍‌र्ही स्टॉक ब्रोकिंगचे दलाल पेढी म्हणून सदस्यत्व रद्दबातल केले आहे. हद्दपारीची ही कारवाई सोमवार, २३ नोव्हेंबरपासून अमलात आली आहे, असे एनएसईने स्पष्ट केले.

मुखत्यार पत्रांचा (पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी) गैरवापर करून गुंतवणूकदार ग्राहकांच्या डीमॅट खात्यांतील रोख्यांना स्वत:च्या डीमॅट खात्यावर घेऊन २,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्याच्या उलाढाली केल्याचा काव्‍‌र्हीवर ठपका आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये हा गैरप्रकार सिद्ध झाल्यावर, भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने काव्‍‌र्हीवर नवीन ग्राहक नोंदविण्याला मज्जाव केला होता.

बरोबरीने डिसेंबर २०१९ मध्ये एनएसईनेदेखील काव्‍‌र्हीचे बाजारात व्यापार करण्याचे हक्क हिरावून घेतले होते.

आता त्या गैरवर्तनाची आणखी कठोर शिक्षा देताना काव्‍‌र्हीला भांडवली बाजारातून एनएसईने हद्दपारच केले आहे.

अभिप्राय द्या!