गेल्या काही महिन्यांत अर्थव्यवस्थेतील फेरउभारीचे सकारात्मक संकेत मिळत असले तरीही करोना आजारसाथीने अनेकांच्या रोजगार- उपजीविकेचा घास घेतला आहे. नोकरी/ उत्पन्न गमावल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला लोकांना सामोरे जाता यावे यासाठी भारतातील ऑनलाइन विमा विक्रेता मंच असलेल्या ‘पॉलिसीबाजार’ने नवीन विभाग ‘जॉब लॉस इन्श्युरन्स’ उत्पादनांसाठी सुरू केला आहे.

कोविड-१९ च्या उद्रेकानंतर जवळपास एक कोटीच्या घरात पगारदार भारतीयांनी नोकऱ्या गमावल्या असल्याचा अंदाज असून, उत्पन्नाचे साधन गमावल्यामुळे त्यांना भेडसावणारी आर्थिक अनिश्चितता ही चिंतेची बाब बनली आहे. अशा मंडळींना ठरावीक कालावधीसाठी गमावलेल्या उत्पन्नाची भरपाई ही विम्याद्वारे मिळावी, अशा प्रयत्नातून पॉलिसीबाजारने हे पाऊल टाकले आहे.

भारतात आजच्या घडीला तरी नोकरी गमावल्यामुळे होणाऱ्या उत्पन्नातील नुकसानीची भरपाई करणारी परिपूर्ण विमा योजना अस्तित्वात नाही. काही सामान्य विमा कंपन्यांनी अशा प्रकारचे संरक्षण हे त्यांच्या आरोग्य विमा अथवा गृह विमा उत्पादनांमध्ये उपलब्ध असलेल्या फायद्यांपैकी एक म्हणून लोकांना उपलब्ध केले आहे. पॉलिसीबाजारनेही या नव्या विभागाच्या माध्यमातून एसबीआय जनरल, श्रीराम जनरल, युनिव्हर्सल सोम्पो आणि आदित्य बिर्ला यांसारख्या विमा कंपन्यांच्या अशाच ‘जॉब लॉस’ हा अतिरिक्त फायद्याचा पर्याय असलेल्या योजना उपलब्ध करून दिल्या आहेत.

अभिप्राय द्या!