करोना संकटअसताना देखील २०२० च्या दुसऱ्या सहामाहीत जोखीम घेणाऱ्या कंपन्यांनी आयपीओतून हजारो कोटींचे भांडवल उभारून दाखवले. त्यातून धडा घेत जवळपास डझनभर कंपन्यांनी प्राथमिक बाजारात नशीब आजमावण्याची तयारी केली आहे. एक दोन नव्हे तर तब्बल १५ आयपीओ भांडवली बाजारात धडकण्याच्या तयारीत आहेत. यातील किमान सहा आयपीओ जानेवारी महिन्यात बाजारात दाखल होणार आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना कमाईची संधी चालून येणार आहे.
या वर्षात इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन , कल्याण ज्वेलर्स, SSFB, ESAF स्मॉल फायनान्स बँक, इंडिगो पेंट्स, ब्रुकफिल्ड RIET, Barbeque Nation आणि रेलटेल या कंपन्या आयपीओ आणणार आहेत. जानेवारीत इंडिगो पेंट्स, होम फर्स्ट फायनान्स कंपनी, आयआरएफसी, ब्रुकफिल्ड RIET तसेच रेलटेल या कंपन्यांचे आयपीओ बाजारात धडक देतील, अशी शक्यता आहे.
इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनचा एकूण ४६०० कोटींचा आयपीओ आहे. कल्याण ज्वेलर्स १७०० कोटी उभारणार आहे. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेची ४०० कोटींची योजना आहे. तर ESAF स्मॉल फायनान्स बँक आयपीओतून १००० कोटी उभारणार आहे.त्याशिवाय लक्ष्मी ऑर्गेनिक इंडस्ट्रीज ८०० कोटी, इंडिगो पेंट्स १००० कोटी क्राफ्ट्समन ऑटोमेशन १५० ते १८० कोटी आणि ब्रुकफिल्ड RIET कडून ४००० ते ४५०० कोटीचा आयपीओ आणला जाण्याची शक्यता आहे. Barbeque Nation चा १००० ते १२०० कोटींचा आयपीओ असेल.
भांडवली बाजारातील तेजीचा लाभ घेण्यासाठी अनेक कंपन्या आयपीओ आणण्याच्या तयारीत आहेत. २०२० मध्ये २४ कंपन्यांनी सेबीकडे आयपीओसाठी अर्ज सादर केला होता. यातील ६ आयपीओ बाजारात येऊन गेले. आता १८ कंपन्यांना भांडवल उभारणीची परवानगी मिळाली आहे.