अन्नधान्याच्या किमती उतरल्यामुळे देशातील किरकोळ महागाईच्या दरात सरलेल्या डिसेंबरमध्ये घट दिसून आली. ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारे मोजल्या जाणारा हा महागाई दर ४.५९ टक्के नोंदविण्यात आल्याचे सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाकडून मंगळवारी स्पष्ट करण्यात आले.

ऑक्टोबर २०२० मधील ७.६१ टक्के हा मे २०१४ नंतर कळसाचा स्तर गाठणारा किरकोळ महागाई दर, त्यानंतरच्या नोव्हेंबर महिन्यातही ६.९३ टक्के अशा चढय़ा स्तरावर होता.

उल्लेखनीय गोष्ट म्हणजे वर्षभरापूर्वी, डिसेंबर २०१९ मध्ये किरकोळ महागाई दर ७.३५ टक्क्य़ांवर होता. त्या तुलनेत यंदाच्या डिसेंबरसाठी नोंदविला गेलेला ४.५९ टक्के दर हा या आघाडीवरील मोठा दिलासाच ठरतो.

रिझव्‍‌र्ह बँकेने महागाई दराबाबत निर्धारित केलेल्या सहा टक्क्य़ांच्या वरच्या मर्यादेच्या आतच तो नोंदला गेला आहे.

अन्नधान्याच्या किमतीत झालेला लक्षणीय सुधार हे महागाई दरातील घसरणीचे प्रमुख कारण आहे. आधीच्या महिन्यांतील ९.५ टक्क्य़ांवरून डिसेंबर २०२० मध्ये अन्नधान्य महागाई दर ३.४१ टक्क्य़ांवर गडगडल्याचे उपलब्ध आकडेवारी स्पष्ट करते.

अभिप्राय द्या!