आधीच्या सत्रात झालेल्या विक्रीने मोठी पडझड अनुभवलेल्या भांडवली बाजारातील मंगळवारच्या व्यवहारावर तेजीवाल्यांना पुन्हा पकड मिळविल्याचे दिसून आले. बँका, वित्तीय सेवा आणि वाहन कंपन्यांच्या समभागांच्या खरेदीत गुंतवणूकदारांनी रस दाखविला.

विदेशात विकसित करोना प्रतिबंधक लशींना मंजुरीची प्रक्रिया वेगवान करण्याचा सरकारने घेतलेला निर्णय तसेच रशियाच्या स्पुटनिक या लसीच्या भारतात आपत्कालीन वापरास दिलेली मंजुरी या घटकांचा भांडवली बाजारावर मंगळवारी खूपच सकारात्मक परिणाम दिसून आला. विशेषत: जशी अपेक्षा केली जात होती त्यापेक्षा  पसरत असलेली करोनाची दुसरी लाट आणि त्यातून पुन्हा संपूर्ण टाळेबंदी सरकारकडून लागू केली जाण्याच्या शक्यतेने भांडवली बाजारात सोमवारी घबराटीचे वातावरण पसरले होते. मात्र स्पुटनिकच्या रूपाने तिसऱ्या लशीचा मार्ग भारतात खुला होणे बाजारासाठी खूपच सुखावणारे ठरले आणि सेन्सेक्सने घेतलेल्या ६६०.६८ अशांच्या मोठय़ा झेपेने ते दाखवून दिले.

मंगळवारचे बाजारातील व्यवहार आटोपले तेव्हा सेन्सेक्स ४८,५४४.०६ अंशांवर स्थिरावला होता. त्याच बरोबरीने निफ्टी निर्देशांकाने १९४ अंशांची भर घालून १४,५०४.८० या पातळीवर दिवसाला निरोप दिला. महिंद्र अँड महिंद्र, बजाज फिनसव्‍‌र्ह, बजाज फायनान्स, मारुती, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, ओएनजीसी आणि अ‍ॅक्सिस बँक यांचे मूल्य गुंतवणूकदारांकडून खरेदी झाल्याने वाढलेले दिसून आले.

अभिप्राय द्या!