आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंडाने नवीन मल्टी कॅप फंडाची घोषणा केली आहे. या योजनेत गुंतवणूकदारांना लार्ज कॅप , मिडकॅप आणि स्मॉल कॅप अशा तिन्ही श्रेणीत गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे. आज सोमवार १९ एप्रिलपासून ही गुंतवणूक योजना खुली झाली आहे.
आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंडाचा मल्टी कॅप फंडात किमान ५०० रुपये गुंतवणूक करता येणार आहे. आजपासून हा फंड खुला झाला असून ३ मे २०२१ पर्यंत यात गुंतवणूक करता येईल, असे कंपनीने म्हटलं आहे. मल्टी कॅप फंड हा सर्वसाधारणपणे एका विशिष्ट रचनेनुसार तिन्ही मार्केट कॅप श्रेणीमध्ये गुंतवणूक करतो. लार्जकॅप, मिडकॅप आणि स्मॉल कॅप अशा प्रत्येक श्रेणीत किमान २५ टक्के गुंतवणूक केली जाते. मल्टी कॅप फंड गुंतवणूकदारांना तिन्ही श्रेणीत गुंतवणूक संधी देतो. लार्ज कॅपमध्ये स्थिरता असून मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये वृद्धीची संधी असते.
लार्ज कॅप हे चांगल्या दर्जाचे शेअर असतात. हे शेअर प्रत्येक पोर्टफोलिओमध्ये असावेत, मात्र दीर्घ कालावधीत संपत्ती निर्माण करण्याच्या दृष्टीने मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअरमध्ये गुंतवणूक करायला हवी, असे मत आदित्य बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ए. बालसुब्रमणियम यांनी व्यक्त केले. मल्टी कॅप फंड हे तिन्ही मार्केट कॅपचे मिश्रण आहे. यात ‘एसआयपी’च्या माध्यमातून सहजपणे गुंतवणूक करता येऊ शकते. विशेष म्हणजे ज्यावेळी अर्थव्यवस्था उभारी घेते, तेव्हा मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर बहारदार कामगिरी करतात.