सध्या शेअर बाजारात तेजीचे वारे सुटले आहे. पावसात ज्याप्रमाणे सर्व ठिकाणी भूछत्र येतात, त्याचप्रमाणे तेजीतील शेअर बाजारात “डायरेक्ट’ अथवा “इनडायरेक्ट’ पद्धतीने अशी अनेक लोक प्रवेश करतात आणि सर्वसामान्य गुंतवणूकदारांना जास्त परताव्याच्या आमिषाने फसवतात. जास्त परतावा मिळेल, या आशेने सर्वसामान्य गुंतवणूकदार त्याच-त्याच चुका वारंवार करतात व अनेकदा अशी फसवणूक होऊनसुद्धा हेच गुंतवणूकदार दरवेळेस नवनव्या प्रलोभनांना बळी पडताना दिसतात.
शेअर बाजाराबद्दल बोलायचे झाल्यास, असा बाजार तेजीच्या लाटेवर स्वार झाल्यावर अचानक आपल्याला नित्यनेमाने “एसएमएस’द्वारे अमुक शेअर घ्या, याचा तमुक पटीने भाव वाढेल, कारण मोठ्या लोकांनी, वित्तीय संस्थानी हे शेअर खरेदी केले आहेत, आपणही त्यात मोठी गुंतवणूक करावी, असे “एसएमएस’मध्ये सुचवले गेलेले असते. सामान्य गुंतवणूकदार अशा फसव्या माहितीला बळी पडून आपले मेहनतीचे पैसे यात अडकवतात. कोणतीही माहिती न घेता केलेली ही गुंतवणूक ज्या वेळेस अंगलट येते, तोपर्यंत हा गुंतवणूकदार उत्तम परतावा देणाऱ्या गुंतवणुकीकडे पाठ करून उभा राहतो. फसवणूक झाल्यावर हाच गुंतवणूकदार आपल्या परिचयाच्या अनेकांना शेअर बाजार हा सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी नाही, अशी भावना प्रखरपणे रुजवतो.
शेअर बाजारात जोखीम ही कायमच असते. त्यात जर आपण अशा प्रलोभनांना भुललो तर नक्कीच आपली फसवणूक होणार, हे सांगण्यास ज्योतिषाची गरज भासू नये.म्हणून म्हणतो सावधान !!