अलिबाबा ग्रुप होल्डिंग लिमिटेड समर्थित ‘बिगबास्केट’ या ऑनलाइन किराणा विक्रेता व्यासपीठीच्या टाटा सन्सच्या संपादन व्यवहाराला भारतीय स्पर्धा आयोगाने मान्यता दिली.

या व्यवहारात, टाटा डिजिटल लिमिटेडकडून, बिगबास्केटची प्रवर्तक सुपरमार्केट ग्रोसरी सप्लाइज प्रा. लि.चे ६४.३ टक्के भागभांडवल ताब्यात घेतले जाईल. तसेच इनोव्हेटिव्ह रिटेल कॉन्सेप्ट्स प्रा. लिमिटेडवरही आता टाटा डिजिटलचे नियंत्रण येणार आहे. टाटा डिजिटल ही टाटा सन्सची १०० टक्के मालकी असलेली उपकंपनी असून, ती लॉयल्टी प्रोग्राम, ऑफर्स आणि देयक व्यवहाराशी संबंधित तंत्रज्ञान सेवा प्रदान करते.

भारतातील २५ बड्या शहरांमध्ये कार्यरत आणि वितरण सेवा असणारी बिगबास्केटची स्थापना २०११ साली झाली आहे. टाटा डिजिटल किंवा बिगबास्केट यापैकी कोणाकडून या व्यवहारामागील आर्थिक बाबी अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलेल्या नाहीत.

अभिप्राय द्या!