करोनाच्या दुसऱ्या लाटेवर लक्ष ठेवून असलेल्या रिझर्व्ह बँकेकडून आज बुधवारी महत्वाच्या उपाययोजनांची घोषणा करण्यात आली आहे. आज आरबीआय गव्हर्नर यांनी थोड्याचवेळा पूर्वी तातडीची परिषद घेऊन आरबीआयच्या निर्णयांची घोषणा केली. गतवर्षी प्रमाणे यंदा लॉकडाउनची धग अर्थव्यवस्थेला लागू नये, यासाठी आधीच रिझर्व्ह बॅंकेने खबरदारीचे उपाय जाहीर केले आहेत. यामुळे वैयक्तिक कर्जदार, छोटे उद्योजक, वैद्यकीय क्षेत्रातील कंपन्या आणि राज्य सरकारांना दिलासा मिळाला आहे.
आज गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ५० हजार कोटींचा अतिरिक्त निधी उपलब्ध करण्याची घोषणा केली. यासाठी रेपो दराने बँकांना हा निधी पुढील तीन वर्षांसाठी उपलब्ध होईल. या विशेष खिडकीची सुविधा ३१ मार्च २०२२ पर्यंत सुरु राहणार असल्याचे दास यांनी स्पष्ट केले. आज बँकेने अतिरिक्त रोकड उपलब्ध करणे, वैयक्तिक कर्जदार आणि उद्योजकांसाठी कर्जपुनर्रचनेचा पर्याय, राज्यांना अतिरिक्त कर्जाचा पर्याय उपलब्ध करण्यात आला.
त्याशिवाय रिझर्व्ह बँक खुल्या बाजारातून ३५ हजार कोटीचे सरकारी रोखे खरेदी करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. २० मे रोजी G-SAP 1.0 अंर्तगत रोखे खरेदी केली जाणार आहे. रिझर्व्ह बँक देशातील करोनाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. मात्र करोनामुळे अर्थव्यवस्थेत बाधा येण्याची जोखीम वाढली असल्याचे दास यांनी सांगितले.